मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट झाल्यानंतर नव्याने पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेल्या हरदीपसिंग पुरी यांना कंपन्यांनी आज पहिल्याच दिवशी इंधन दरवाढीची सलामी दिली. आज गुरुवारी देशभारत पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये ९ पैशांची वाढ झाली आहे. याआधी बुधवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी वधारले आहे. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर 'जैसे थे'च ठेवले होते. आजच्या दरवाढीनंतर गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०६.५९ रुपयांवर गेला आहे. दिल्लीत पेट्रोल १००.५६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.३७ रुपये इतका वाढला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १००.६२ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०८.८८ रुपये इतका वाढला आहे. आज देशभरात डिझेल दरात देखील वाढ झाली आहे. आज मुंबईत डिझेलचा भाव ९७.१८ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत ९४.१५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६५ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४० रुपये झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींनी सहा वर्षांचा उच्चांक गाठला आहे.ब्रेंट क्रूडचा भाव ७६.९८ डॉलर प्रती बॅरल झाला. त्याआधी तो ७६.९० डॉलरपर्यंत गेला होता. तेलाच्या किमतीतील तेजीने नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता कमी आहे.