साओ पाओलो: ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सनारो यांना मोठा धक्का बसला आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोवॅक्सिन लस खरेदी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. या चौकशीचा अहवाल ९० दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ब्राझीलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझील सरकारने भारतीय कंपनी भारत बायोटेकसोबत लस खरेदी करारावर स्वाक्षरी केली. यामध्ये एका डोसची किंमत १५ डॉलर (जवळपास १११७ रुपये) सांगण्यात आली. तर, दिल्लीतील ब्राझील दूतावासाच्या एका गुप्त माहितीनुसार कोवॅक्सिन लशीच्या एका डोसची किंमत १.३४ डॉलर (जवळपास १०० रुपये) होती. वाचा: लस खरेदीच्या घोटाळ्यावरून ब्राझीलमधील विरोधी पक्षांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुप्रीम कोर्टात धाव या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी ९० दिवसांत पूर्ण करून सुप्रीम कोर्टाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. वाचा: लस खरेदी कराराबाबत राष्ट्रपती बोल्सनारो यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, ब्राझीलच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात डाव्या आणि मध्यममार्गी विचारांच्या पक्षांनी राष्ट्रपती बोल्सनारो यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. वाचा: मागील आठवड्यात ब्राझीलने भारत बायोटेक कंपनीसोबत केलेल्या करोना लशीचा करार रद्द केल्याची घोषणा केली होती. ब्राझीलमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या करारावरून मोठा गदारोळ सुरू आहे. त्यानंतर ३२ कोटी डॉलरचा करार रद्द केल्याची घोषणा सरकारने केली. वाचा: करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची संसदीय समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीत ब्राझील सरकारने कोवॅक्सिन लस अधिक दरात खरेदी करण्यात आली असल्याचे दिसून आले. त्यानंतर ब्राझील सरकारच्या या करारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. याआधी फायजर कंपनीने ब्राझील सरकारला कोवॅक्सिनपेक्षा कमी दरात लस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ब्राझील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आहे.