एसटीच्या गाडीवर साडेनऊ हजारांची फवारणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 30, 2021

एसटीच्या गाडीवर साडेनऊ हजारांची फवारणी

https://ift.tt/3j29kSx
म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यात करोनाबाधितांचा सरासरी दर ३.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सर्व बसवर विशेष रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळ एका बसमागे तब्बल साडेनऊ हजार रुपये मोजणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात १७ हजारांहून अधिक बस आहेत. फवारणी केल्यानंतर पाऊस आल्यास किंवा महामंडळाने गाडी आतून-बाहेरून धुतल्यास फवारणीचा उपयोग होईल का, हा प्रश्न कायम आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यानूसार महामंडळाने अॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग म्हणजेच ढोबळमानाने विषाणू मारण्यासाठी रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या सर्व प्रवासी बसमध्ये आतून तसेच बाहेरून ही फवारणी करण्यात येणार आहे. एकदा फवारणी केल्यास सहा महिन्यांसाठी त्याची वैधता असेल. फवारणी केल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचा विषाणू तग धरू शकणार नाही. दुसऱ्या प्रकारच्या फवारणीची वैधता दोन महिन्यांसाठी असणार आहे. काही गाड्याांना वर्षातून दोनदा तर काही गाड्यांना वर्षातून सहा वेळ फवारणी करण्यात येईल. महामंडळातील जवळपास सर्वच बसला ही कोटिंग करण्यात येईल. यासाठी नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिबस खर्च आहे, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात फवारणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार गाड्या असून सर्वच वाहनांवर फवारणी करण्यात येईल, असे यंत्र व अभियंता विभागाकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळातील बसमधून १०० टक्के प्रवासी वाहतुकीला मुभा सरकारने दिलेली आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर गाड्या धावत आहेत.