गर्भवतींच्या लसीकरणाचे प्रमाण अद्याप शून्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 9, 2021

गर्भवतींच्या लसीकरणाचे प्रमाण अद्याप शून्य

https://ift.tt/3jZJoJi
म. टा. विशेष प्रतिनिधी, गर्भवतींचेही लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असली तरी अद्याप गर्भवतींचा लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पालिकेने लसीकरण मोहीम वेगवेगळ्या वयोगटामध्ये आग्रहीपणे राबवली असली तरीही त्यात गर्भवतींच्या लसीकरणाचे प्रमाण शून्य आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता या गटामध्ये लसीकरणासंदर्भातील नियमावली तयार करण्यात येणार आहे. स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सोनल कुमता यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गरोदर महिलांमध्ये लसीकरणाची गरज का आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक गरोदर महिलांमध्‍ये लक्षणे दिसणारही नाहीत. काही महिलांमध्ये सौम्‍य लक्षणे असली तरीही त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. गर्भवतींनी स्वतःला व बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी लसीकरण करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्‍या गरोदर महिलांना गंभीर आजार व मृत्‍यू होण्‍याचा अधिक धोका नाकारता येत नाही. त्यामुळे गंभीर आजाराच्‍या स्थितीमध्‍ये इतर रुग्‍णांप्रमाणे गर्भवतींना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागण्याची वेळ येऊ शकते. उच्‍च रक्‍तदाब, लठ्ठपणा असे आजार असलेल्‍या व ३५ वर्षांवरील गरोदर महिलांना संसर्गाचा अधिक धोका असू शकतो. संसर्गमुक्त झालेल्या गर्भवती लसीकरणासाठी पात्र आहेत. अशा महिलांनी संसर्ग झाल्‍याच्‍या १२ आठवड्यांनंतर किंवा करोनामुक्त झाल्‍याच्‍या आठ आठवड्यांनंतर लस घ्‍यावी, असे स्त्रीरोग व प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी मेहता यांनी सांगितले. कोणत्‍याही औषधाप्रमाणे लशीचे देखील दुष्‍परिणाम असू शकतात. इंजेक्‍शन घेतल्‍यानंतर गरोदर महिलेला सौम्‍य ताप, तसेच लस घेतलेल्या जागी वेदना होऊ शकतात, असेही डॉक्टरांनी सांगितले. नोंदणी कुठे करावी? गरोदर महिलांनी लसीकरणासाठी लागणारी नोंदणी कोविन पोर्टलवर करण्‍याची गरज आहे. त्‍या केंद्रावर जाऊन देखील नोंदणी करू शकतात.