नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू ( ) आहे. दिल्लीत उद्या संध्याकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळात समावेश केला जाणाऱ्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या निवडीसाठी फॉर्म्युला दिसून येत आहे. अनुभव, महिला प्रतिनिधित्व, तरुण यासह राजकीयदृष्ट्या महत्त्व असलेल्या राज्यांना सांधण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच तरुण आणि उच्च शिक्षितांचा समावेश असेल, असं सूत्रांनी सांगितलं. ज्योतिरादित्य शिंदेः मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदेंचं स्थान निश्चित झालं आहे. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार पुन्हा आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. ज्योतिरादित्य हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. यानंतर ते भाजपकडून राज्यसभेवर खासदार झाले. वरुण गांधीः पिलीभीतमधून खासदार असलेल्या वरुण गांधींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून ते येतात. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी निवडणूकही होत आहे. निशिथ प्रामाणिकः पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील खासदार असलेले तरुण नेते निशीथ प्रामाणिक यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. ३५ वर्षांचे प्रामाणिक २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. पश्चिम बंगाल भाजपसाठी महत्त्वाचे आहे. सर्वानंद सोनोवालः आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचेही मंत्रिमंडळातील स्थान निश्चित झाले आहे. त्यांनी हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी आसामचे मुख्यमंत्रीपद सोडले. सोनोवाल हे यापूर्वीही पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात होते. २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ते मुख्यमंत्री झाले. नारायण राणेः नारायण राणे ( ) हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेना सोडून नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेले. यानंतर त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसचा राजीनाम दिला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. नंतर त्यांनी पक्ष भाजपमध्ये प्रवेश करत पक्षही विलीन केला. राणे हे भाजपकडून राज्यसभेचे खासदार आहेत. महिला प्रतिनिधित्व प्रतिम मुंडेः भाजपचे वरिष्ठ आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या ( ) आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्या लोकसभेवर निवडून गेल्या. ३८ वर्षांच्या प्रितम मुंडे या डॉक्टर आहेत. बीडमधील भाजपच्या खासदार आहेत. हिना गावितः हिना गावित या नंदुरबारमधून भाजपच्या खासदार ( ) आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आहेत. हिना गावित या ३४ वर्षांच्या आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास उत्तर महाराष्ट्रात भाजपचे दबदबा आणखी वाढणार आहे. अनुप्रिया पटेलः पटेल या पंतप्रधान मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्री होत्या. त्या एनडीएतील अपना दलाच्या प्रमुख आहेत. यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना पुन्हा केंद्रात स्थान देऊन सहकारी पक्षांना एकजुटतेचा संदेश देत आहे. मिनाक्षी लेखीः दिल्लीतील खासदार मिनाक्षी लेखी यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायाने त्या वकील आहेत. मंत्रिमंडळात दिल्लीचे प्रतिनिधित्व करतील. अनुभव याशिवाय बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय, तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णवः ओडिशातील भाजपचे राज्यसभेचे खासदार अश्विनी वैष्णव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. ते आयएएस अधिकारी होते. रंजन सिंहः मणिपूरमधील भाजपचे खासदार रंजन सिंह यांना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला येण्यासाठी फोन केला आहे. ते ६९ वर्षां चे आहेत. माजी सनदी अधिकारी आहेत.