
जम्मू : जम्मूच्या भागात काल सायंकाळी भाजप नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी घडवून आणला. या हल्ल्यात एका अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या मुलाचां नाव वीर सिंह असल्याचं समजतंय. तो जसबीर सिंह यांचा भाचा होता. याशिवाय, या हल्ल्यात आणखीन चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी भाजपचे राजौरी विभाग प्रमुख नेते आपल्या कुटुंबासोबत आपल्या घरीच निवांत बसले असताना दहशतवाद्यांकडून त्यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेडच्या सहाय्यानं घडवून आणलेल्या या हल्ल्यात जसबीर सिंह मात्र बचावलेत. भाजपच्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याची दहशतवाद्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वीही अनंतनागमध्ये भाजपशी निगडीत सरपंच गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी यांची हत्या करण्यात आली होती. आपल्याला दहशतवाद्यांकडून वारंवार धमक्या मिळत होत्या, मात्र सुरक्षेबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचा आरोप कुटुंबानं केलाय. १५ ऑगस्टपूर्वी जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेग आलाय. स्वातंत्र्यदिनापूर्वी संपूर्ण खोऱ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसंच मोठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आलीय.