
मुंबई : डेल्टा व्हेरिएंटने जगभरात पुन्हा एकदा निर्बंधांचे संकट गडद बनले आहे. त्याचे परिणाम कमॉडिटी बाजारावर उमटले आहेत. इंधन मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. तरीही तूर्त भारतीयांना स्वस्त इंधनासाठी वाट पहावी लागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग २७ व्या दिवशी पेट्रोल आणि स्थिर ठेवला आहे. आज शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थेच आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सलग दोन सत्रात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली होती. गुरुवारी त्यात घसरण झाली. डेल्टा व्हेरिएंटमुळे तेलाची मागणी कमी झाली आहे. यामुळे गुरुवारी कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१६ डॉलरने घसरला आणि ६९.०९ डॉलर प्रती बॅरल झाला. तसेच ब्रेंट क्रूडचा भाव ०.१३ डॉलरची घसरण झाली आणि ब्रेंट क्रूडचा भाव ७१.३१ डॉलर प्रती बॅरल झाला.