
: पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फळ विक्रेत्याला चार लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालच्या टोळीतील दोन भामट्यांना पारडी पोलिसांनी अटक केली आहे. सौमिक सुजयकुमार घोष (वय ३७) आणि इद्रिस युनूस मिस्त्री (वय ४८ दोन्ही रा. दक्षिण परगना, पश्चिम बंगाल ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुलै महिन्यात आरोपींचा साथीदार खैरुल शेख हा फळविक्रेते लीलाधर मनोहर शाहू (वय ३९,रा.शिवनगर) यांच्या दुकानात आला. त्याने शाहू यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवलं. २५ जुलैला शेख व त्याचे तीन साथीदार शाहू यांच्या घरी गेले. त्याने शाहू यांना बादलीत गरम पाणी आणायला लावले. भामट्यांनी पाण्यात रसायन टाकले. त्यात शाहू यांनी दिलेल्या चार लाख रुपयांच्या नोटा टाकण्याचा बनाव केला व बादलीवर झाकण ठेवले. काही वेळाने झाकण उघडून बघा, असं सांगून शेख व त्याचे साथीदार पैसे घेऊन फरार झाले. काही वेळाने शाहू यांनी बादलीचे झाकण उघडून बघितले असता त्यात केवळ १०० रुपयांच्या आठ नोटा होत्या. याप्रकरणी शाहू यांनी पारडी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पारडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटकाने, निरीक्षक शिंदे, सहायक निरीक्षक मारुती शेळके, शिपाई विजय दासरवार, कृष्णा इवनाते, भूषण झरकर यांनी भामट्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेशन तपासले. त्यावेळी भामटे पश्चिम बंगालमध्ये असल्याचं स्पष्ट झालं. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक बंगालमध्ये गेलं आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पारडी पोलिसांनी दोघांना अटक केली.