
लंडन : तिसरा सामना गमावल्यावर भारतीय संघात आता मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव घेतले जात आहे ते सूर्यकुमार यादवचे. कारण कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना सातत्याने धावा करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे भारताला मधल्या फळीत एक चांगला फलंदाज हवा आहे. त्यासाठी सूर्यकुमारचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सूर्यकुमारला भारतीय संघात कशी संधी मिळू शकते, पाहा...विराट, पुजारा आणि रहाणे या तिघांना संघातून काढले जाऊ शकते, अशी शक्यता कमी दिसत आहे. पण जर सूर्यकुमारला खेळवायचे असेल तर त्यासाठी एक वेगळी योजना भारतीय संघाला आखावी लागू शकते. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी रिषभ पंतला संघातून डच्चू दिला जाऊ शकतो. पंत संघाबाहेर गेल्यावर लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली तर एका फलंदाजाची जागा संघात तयार होऊ शकते. त्यामुळे पंतला संघाबाहेर करून जर राहुलकडे यष्टीरक्षण सोपवले तर सूर्यकुमार हा संघात येऊ शकतो आणि यामध्ये कोहली, पुजारा व रहाणे यांच्या स्थानाला धक्काही लागणार नाही. त्याचबरोबर भारताची फलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट केल्या सूर्यकुमार संघात येऊ शकतो. सूर्यकुमारला संघात स्थान देण्याचे दुसरे समीकरणही आहे, पण त्यासाठी पुजारा किंवा रहाणे यांच्यापैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. या दोघांपैकी एकाला विश्रांती दिली तरच सूर्यकुनार संघात येऊ शकतो. कारण पाच गोलंदाजांनिशी आपण मैदानात उतरणार असल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोलंदाजीमध्ये स्थानांमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे जर सूर्यकुमारला खेळवायचे असेल तर हे दोन पर्याय सध्याच्या घडीला भारतीय संघासमोर उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर भारताला आपली फलंदाजी बळकट करायची असेल आणि सूर्यकुमारला संधी द्यायचा त्यांचा विचार असेल तर यापैकी दोन पर्यायांचा विचार भारतीय संघ करू शकतो.