
: व्याजवाडी (ता. वाई) येथील नराधम आरोपीने अडीच वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून मृतदेह पुरला होता. तो बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांनी केले. मृत महिलेचे काही अवयव सापडले असले तरी कवटी सापडली नाही. दुर्गम ठिकाण, दलदल व पाण्याचा प्रवाह यामुळे अवयव शोधताना पथकाची दमछाक झाली. प्रतिकूल परिस्थितीत शोध पथकाने राबवलेली ही मोहीम अखेर थांबवण्यात आली आहे. साताऱ्यातील एका महिलेच्या खून प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक सत्य समोर आलं. आरोपीने आधी आपल्या पत्नीचा खून केला होता आणि आता त्याने आपल्या एकेकाळच्या प्रेयसीलाही संपवलं. प्रेयसी व पत्नीच्या खून प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. व्याजवाडी (ता. वाई) येथील संशयित आरोपी नितीन गोळे याला भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे आणि गुन्हे प्रकटीकरण टीम यांच्या संयुक्त कारवाईत कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. त्यानंतर त्याने पत्नी मनिषा नितीन गोळे (वय ३४, रा. व्याजवाडी) व प्रेयसी सौ. संध्या विजय शिंदे (वय ३४, रा. कारी, ता. सातारा) यांचा खून केल्याची कबुली दिली. अडीच वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा आरोपीने पत्नी मनिषा हिचा अडीच वर्षांपूर्वीच गळा दाबून खून केल्याचे सांगून मृतदेह ज्या ठिकाणी पुरला ती जागा दाखवली. त्या जागेवर गेल्या दोन दिवसांपासून शोध मोहीम राबवण्यात येत होती. महाबळेश्वर ट्रेकर्स व भुईज पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम पार पाडली.