
लंडन : इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आज दमदार शतकी खेळी साकारली आणि भारताच्या विजयाचा मार्ग खडतर केला आहे. कारण आजच्या दिवशी इंग्लंडला लवकर बाद करत आघाडी मिळवण्याचे स्व्न भारत पाहत होता. पण रुटने यावेळी भाराचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशीच्या फलंदाजीवर भारताचे या कसोटीतील भवितव्य अवलंबून असेल. आज इंग्लंडच्या संघाने भक्कम सुरुवात केली. कारण लंचपर्यंत इंग्लंडच्या संघाने एकही विकेट गमावली नव्हती. जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रुटने यावेळी सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. रुट आणि बेअरस्टो ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी बेअरस्टोला बाद केले आणि ही जोडी फोडली. बेअरस्टोने यावेळी सात चौकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. बेअरस्टो बाद झाल्यावर रुटने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण रुटला त्यानंतर अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळत नव्हती, पण रुटने यावेळी एकाकी किल्ला लढवला आणि तो अखेरपर्यंत नाबाद राहीला. रुटने यावेळी १८ चौकारांच्या जोरावर नाबाद १८० धावांची दमदार खेळी साकारली. रुटच्या या खेळीच्या जोरावर इग्लंडला पहिल्या डावात ३९१ धावा करता आल्या आणि त्यांनी २७ धावांची आघाडी घेता आली. इंग्लंडचा अखेरचा फलंदाज बाद झाला आणि पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता उद्या भारताचा संघ फलंदाजीला उतरणार आहे. आता सामन्याचे दोन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस भारतीय संघाला पूर्ण खेळून काढावा लागेल. त्याचबरोबर भारताला चौथ्या दिवशी जलदगतीने धावा जमवाव्या लागतील. कारण जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना इंग्लंडपुढे मोठे आव्हान ठेवावे लागले. त्यामुळे भारतीय संघाला उद्या कसोटी सामन्यात वनडेसारखा खेळ करावा लागले, जेणेकरून त्यांनी २५०पेक्षा जास्त धावा करता येऊ शकतील.