ट्रम्प चीनविरोधात युद्ध पुकारणार होते?; लष्कर प्रमुखांनी साधला होता चीनशी संपर्क! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

ट्रम्प चीनविरोधात युद्ध पुकारणार होते?; लष्कर प्रमुखांनी साधला होता चीनशी संपर्क!

https://ift.tt/3lqkpxV
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर हल्ला करण्याच्या तयारीत होते असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. संभाव्य युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेच्या लष्करप्रमुखाने दोन वेळेस चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी चर्चा केली होती, असेही म्हटले जात आहे. अमेरिकेचे चेअरमन ऑफ ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मार्क मिली यांनी चिनी सैन्याचे जनरल ली जूओचेंग यांच्यासोबत ३० ऑक्टोबर २०२० रोजी पहिल्यांदा दूरध्वनीवरून चर्चा केली होती. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, लष्करप्रमुख मार्क मिली यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या चार दिवस आधी आणि त्यानंतर पुन्हा आठ जानेवारी रोजी चिनी लष्करप्रमुखांशी चर्चा केली होती. ट्रम्प हे निवडणुकीच्या आधी आणि पराभव झाल्यानंतर चीनसोबत युद्ध करू शकतात अशी शंका मिली यांना होती. अमेरिकेत सहा जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेत हिंसाचार केला होता. चीनवर हल्ला झाल्यास त्याबाबतचा सावधानतेचा इशारा दिला जाईल असे लष्करप्रमुख मार्क मिली यांनी चिनी लष्करप्रमुखांना म्हटले होते. वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त बॉब वुडवर्ड आणि राबर्ट कोस्टा या पत्रकारांनी लिहिलेल्या 'पेरिल' या पुस्तकाच्या आधारे दिले आहे. हे पुस्तक २०० सूत्रांसोबत केलेल्या चर्चेवर आधारीत आहे. येत्या काही दिवसात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. ट्रम्प यांनी दावा फेटाळला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. ही घटना काल्पनिक असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी म्हटले की, हे वृत्त खरं असेल तर मिली यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा. मी चीनवर हल्ला करण्याचा विचार केला होता, याबाबत पुरावा द्यावा, असेही ट्रम्प यांनी म्हटले. चीनसोबतच्या युद्धाचा विचार केला नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लष्करप्रमुख मिली यांच्याकडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. तर, रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मार्को रुबियो यांनी लष्करप्रमुख मिली यांना पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडे केली आहे.