
गुवाहाटी: आसाममधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. परीक्षेत शॉर्ट्स घातल्याने एका १९ वर्षीय विद्यार्थीनीला परीक्षेला बसण्यापूर्वी तिला आपल्या पायांभोवती सर्व बाजूंननी पडदा गुंडाळण्यास भाग पाडलं गेलं. विद्यार्थीनीसोबत झालेल्या या गैरवर्तणुकीनंतर वाढता आक्रोश पाहता आसाम कृषी विद्यापीठाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनी कोणतीही औपचारिक तक्रार केलेली नाही. गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस (जीआयपीएस) च्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी ही विद्यार्थिनी बुधवारी तिच्या मूळ गावी विश्वनाथ चारियाली येथून तेजपूरला गेली होती. परीक्षेवेळी निरीक्षकांनी तिच्या शॉर्ट्सवर बुधवारी आक्षेप घेतला. प्रवेश परीक्षेसाठी कुठल्याही ड्रोस कोडचा नियम नाही, असं विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तिने परीक्षा निरीक्षकांना सांगितलं. पण तरीही परीक्षा निरीक्षकांनी आपलं काहीच ऐकलं नाही, असं विद्यार्थीनीने म्हटलं. शॉर्ट्स घातल्यामुळे निरीक्षकांनी विद्यार्थीनीला परीक्षेस बसण्यास परवानगी नाकारल्याने ती परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडे गेली. तिने वडिलांना घरून ट्राउजर आणण्यास सांगितलं. आपण बाजारातून ट्राउजर आणेपर्यंत कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मुलिला पाय झाकण्यासाठी पडदा आणून दिला होता, असं विद्यार्थीनीचे वडील बाबुल तमुली यांनी सांगितलं. परीक्षेवेळी घडलेल्या घटनेमुळे आपल्या मुलीवर मोठा आघात झाला. यानंतर तिने पत्रकारांशी संवाद साधत आपल्यावर बेतलेल्या अपमानजनक घटनेची माहिती दिली. यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं. अनेकांनी या घटनेचा निषेध केला. पण एका शिक्षण संस्थेतील ड्रेस कोडचे पालन न केल्यामुळे अनेकांनी माझ्या मुलीवर टीकाही केली. यामुळे तिला अधिक मानसिक त्रास झाला आहे, असं तमुली यांनी सांगितलं. आम्ही हे प्रकरण पुढे न नेण्याचं ठरवलं. आपल्या मुलीच्या शैक्षणिक आणि मानसिक भल्यासाठी आम्ही हे प्रकरण इथेच थांबवलं आहे. आता तिने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावं, असं तमुली म्हणाले. या प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालं आहे. शॉर्ट्स घातल्यामुळे एका विद्यार्थीनीला परीक्षेला बसू न देणं हे धोकादायक आणि प्रतिगामी मानसिकता दर्शवणारं आहे, असं काँग्रेस प्रवक्त्यानं म्हटलं आहे.