
परिवहन प्राधिकरण ाच्या नियमाची १ जानेवारीपासून अंमलबजावणी म. टा. प्रतिनिधी मुंबई : टॅक्सींच्या छतावर दिवे नसतील, तर संबंधित वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' म्हणजेच 'वाहन योग्यता प्रमाणपत्र' मिळणार नाही, या परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी आता १ जानेवारी २०२२ पासून करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपूर्वी सर्व टॅक्सी चालकांनी आपल्या टॅक्सीच्या छतावर दिवे लावणे बंधनकारक असून असे दिवे नसल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये सेवा नाकारण्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी टॅक्सी च्या छतावर दिवे (रूफ-लाइट) बसवण्याचा उपाय शोधण्यात आला आहे. मीटर टॅक्सींच्या छतावर तीन रंगातील दिवे बसविण्यात येणार आहेत. यामुळे गाडी सेवेसाठी उपलब्ध आहे की नाही, हे तात्काळ प्रवाशांना समजणार आहे. गृह विभागाचे (परिवहन) सचिव आशीष कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय झाला. १ फेब्रुवारी २०२०पासून नव्या टॅक्सीची नोंद करताना छतावर दिवे बसविल्याची खात्री करूनच गाडीची नोंदणी करावी, अशी अधिसूचना नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारने काढली होती, तर जुन्या टॅक्सीला छतावर दिवे बसवण्यासाठी १ जानेवारी २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र करोना काळ लक्षात घेता जुन्या टॅक्सीबाबत निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, दुसऱ्या करोना लाटेत राज्यात एप्रिल २०२१पासून लॉकडाउन घोषित करण्यात आला. यामुळे टॅक्सी चालकांना दिवे लावता आले नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव मुंबई मध्य, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सादर करण्यात आला. या प्रस्तावानुसार या जूलैपर्यंतच्या निर्णयाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे छतावर दिवे बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. लोकल अद्याप पूर्ण क्षमतेने लोकल सूरू झालेली नसल्याने टॅक्सीचे उत्पन्न खालावले आहे. करोनापूर्व काळात दररोज एक हजार ते दीड हजार रुपये रोज कमावणाऱ्या टॅक्सीचालकांना सध्या जेमतेम ५०० ते ८०० रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. एकीकडे कमाई अद्याप पूर्वपदावर आलेली नसताना, मीटरमध्ये फेरबदल, दिवे असा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक टॅक्सीचालकांचे छतावर दिवे बसवण्याचे काम रखडले आहे, असे एका टॅक्सी चालकाने सांगितले. दिव्यांचा अर्थ हिरवा रंग- सेवा उपलब्ध असल्यास पांढरा रंग- सेवा बंद असल्यास लाल रंग- टॅक्सीत प्रवासी असल्यास मुंबई महानगर क्षेत्र एकूण टॅक्सींची संख्या ५२ हजार ७४९ छतावर दिवे न बसवलेल्या टॅक्सी ७० टक्क्यांहून अधिक ............ दिवे आणि ते बसवण्यासाठीचा खर्च १,५०० ते २,००० रु. (आकारानुसार किंमत-कमी अधिक होते.)