म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई सांताक्रूझच्या वाकोला परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईवडिलांवर खर्चाचा आर्थिक बोजा पडत असल्याने अकरावीत शिकणाऱ्या मुलीने कामावर जायला सुरुवात केली. परंतु तेवढ्यात करोनाने हाहाकार माजविला आणि नोकरीच गेली. शिक्षण, पुढे लग्न यांचा आर्थिक बोजा घरच्यांवर पडू नये, यासाठी या मुलीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले. सांताक्रूझ पूर्वेकडील दहा बाय दहाच्या झोपडीमध्ये प्रमिला (बदललेले नाव) ही भाऊ आणि आईवडिलांसोबत राहत होती. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. प्रमिलाचे वडील रिक्षाचालक असून आई घरकाम करते. प्रचंड गरिबीत राहणाऱ्या या कुटुंबातील प्रमिला हिने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळताच वाकोला पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रवीण राणे आणि भरत सातपुते हे तिच्या घरी पोहोचले. त्यांनी तिच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यास सुरुवात केली. प्रेमप्रकरण, घरच्यांना विरोध अशी बहुधा कारणे मुलींच्या आत्महत्येमागे असल्याने त्याअनुषंगाने पोलिसाचा तपास सुरू होता. मात्र पालक, शेजारी आणि विशेषत: लहान भावाकडून जी माहिती मिळाली, ती मन हेलावून टाकणारी होती. प्रमिला दहावी पास झाल्यानंतर अकरावीची फी भरण्यासाठीही तिच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. तिच्या वडिलांनी ओळखीच्या मित्रमंडळींकडून सहा हजार रुपये जमा केले. मात्र ही बाब प्रमिला हिला समजताच तिने हे पैसे घेण्यास नकार दिला. कधीतरी हे पैसे परत करावेच लागणार आणि तेव्हा ते कुठून आणणार? असा सवाल करीत तिने स्वत:च नोकरी करण्याचा निर्णय घेतला. जवळच्या एका कारखान्यात ती कामाला जाऊन घरखर्चाला हातभार लावू लागली. मात्र मार्च २०२०मध्ये लागलेल्या लॉकडाउनमुळे हा कारखाना बंद पडला आणि प्रमिलाची नोकरी गेली. आता आपले शिक्षण, पुढे लग्न आणि घरातला रोजचा खर्च कसा झेपणार, या विचाराने अस्वस्थ झालेल्या प्रमिलाने स्वतःच या जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. भावाच्या शिक्षणासाठी दिली सोनसाखळी प्रमिला हिच्या भावाच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनची गरज होती. आता या मोबाइलसाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न पडल्याने प्रमिलाने काही महिने काम करून बचतीमधून विकत घेतलेली सोनसाखळी आईकडे विकण्यासाठी दिली. लग्नासाठी एकच दागिना शिल्लक असल्याने आईवडिलांनी यासाठी तिला विरोध केला. अशी परिस्थिती असतानाच, आईवडील पुन्हा एकदा लग्नासाठी कर्ज काढणार, हा विचारच प्रमिला हिला सातत्याने बैचेन करत होता.