सिगारेट पेटवण्यासाठी काडीपेटी मागितली अन्...; त्या हत्येचं गुढ उकललं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 11, 2021

सिगारेट पेटवण्यासाठी काडीपेटी मागितली अन्...; त्या हत्येचं गुढ उकललं

https://ift.tt/3z2Yce3
म. टा. खास प्रतिनिधी, भांडी बाजारातील बालाजी कोट मंदिराजवळ झालेली हत्या ही काडीपेटी देण्याच्या किरकोळ वादातून झाल्याची बाब संशयित आरोपी शुभम मोरे याच्या चौकशीतून पुढे आली आहे. संशयित मोरेला कोर्टाने १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडे पोलिस चौकशी करीत आहेत. अनिल गायधनी या पन्नासवर्षीय व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह गुरुवारी पहाटे पोलिसांना आढळला होता. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनेचा तपास करीत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपी मोरेला बेड्या ठोकल्या. गायधनी हा भांडी बाजार परिसरातील हॉटेल राजहंसमध्ये दोन दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. मात्र, तो हॉटेलबाहेर झोपत असे. घटनेच्या दिवशी गल्लीत पहुडलेला असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास शुभम तिथे आला. तत्पूर्वी मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांबरोबर घराबाहेर बोलत असल्याने शुभमच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले. त्याच्याकडून दुचाकीची चावी व मोबाइल काढून घेतला. रागाच्या भरात घरातून निघालेल्या शुभमकडे सिगारेट होती. मात्र, काडीपेटी नव्हती. त्यामुळे त्याने गायधनीला उठवून मागणी केली. त्यातून या दोघांमध्ये वादही झाला. या वादात २० वर्षांच्या संशयित मोरेच्या ताकदीपुढे ५० वर्षांच्या गायधनींची ताकद अपुरी पडली. शुभमने रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला पडलेला दगड गायधनींच्या डोक्यात टाकला. त्यात गायधनींचा मृत्यू झाला. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितास कोर्टाने १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने पोलिसांना काडीपेटी मागितल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.