मुंब्रा उड्डाणपूल वर्षअखेरपर्यंत; 'वाय जंक्शन'ची कोंडी फुटणार, २० मिनिटांचा वेळ वाचणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

मुंब्रा उड्डाणपूल वर्षअखेरपर्यंत; 'वाय जंक्शन'ची कोंडी फुटणार, २० मिनिटांचा वेळ वाचणार

https://ift.tt/3zcbe9i
'वाय जंक्शन'ची कोंडी फुटणार; प्रवासाच्या वेळेत २० मिनिटांची बचत म. टा. प्रतिनिधी, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचे कारण ठरत असलेली मुंब्रा, वाय जंक्शन येथील कोंडी आता लवकरच फुटणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. या पुलामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील वाहनधारकांच्या प्रवासात १५ ते २० मिनिटांची बचत होईल. पनवेलकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे मुंब्रा, वाय जंक्शन येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. रस्त्यांवरील भल्यामोठ्या खड्ड्यात एखादी गाडी बिघडली, तर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यावर उपाय म्हणून ८१० मीटर लांब आणि २४.२० मीटर रुंदीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम एमएमआरडीएने २०१८मध्ये हाती घेतले होते. करोनाकाळातही एमएमआरडीएकडून पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहेत. मुंब्रा आणि कल्याण नाका परिसरातील कोंडी फोडण्यासाठी मुंब्रा, कल्याण फाटा आणि शीळफाटा येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. वाय जंक्शन, मुंब्रा येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून चालू वर्षाअखेर हे काम पूर्ण होणार आहे. कल्याण नाका आणि शीळफाटा येथे उभारण्यात येणारे पूल २०२३मधील शेवटच्या तिमाहीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या प्रवक्त्याने दिली. मुंब्रा, वाय जंक्शन पुलासाठी ९७.९७ कोटींचा खर्च आला असून कल्याण नाका व शीळफाटा उड्डाणपुलासाठी एकूण १९१.१७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शीळफाटा येथे ७३९.५० मीटर लांब आणि २४ मीटर रुंदीचा, तर कल्याण नाका येथे १३६७.४७ मीटर लांब आणि १२ मीटर रुंदीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. तिन्ही पूल वाहनधारकांसाठी सुरू झाल्यावर पनवेल येथून गुजरात दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे. जेएनपीटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही मोठा दिलासा मिळणार आहे दोन वर्षे कोंडीचीच कल्याण नाका आणि शीळफाटा येथील वाहतूक कोंडी आणखी दोन वर्षे 'जैसे थे'च राहणार आहे. कोंडीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२३ उजाडणार असल्याने यामार्गाने प्रवास करणाऱ्यांना आगामी दोन वर्षे वाहतूक कोंडीतच घालवावी लागणार आहेत. असा असेल मुंब्रा येथील उड्डाणपूल ८१० मीटर लांब, २४.२० मीटर रुंद सहा पदरी उड्डाणपूल खर्च ९७.९७ कोटी रु.