
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतात परत आल्यापासून त्याच्यावर सतत प्रश्नांचा भडिमार होत आहे. सध्या मीडियाला त्याच्या खेळाशी नाही तर वैयक्तिक आयुष्यात अधिक रस निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी एका रेडिओ वाहिनीने नीरजच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तो खूप अस्वस्थ झाल्याचे दिसून आले होते. आता त्याच्या आणखी एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी मुलाखत घेणाऱ्यांवर तोंडसुख घेण्यास सुरवात केली आहे. 'मला माहित आहे की, हा चुकीचा प्रश्न आहे, पण तरीही...' प्रसिद्ध डिझायनर राजीव सेठी यांनी नीरजला प्रश्न विचारला की, तो त्याचे लैंगिक जीवन आणि प्रशिक्षण कसं बॅलन्स करतो? मुलाखतीवेळी सेठी यांनी नीरजचा सुंदर व्यक्ती असा उल्लेख केला होता. सेठी म्हणाले की, देशातील करोडो लोकांना विचारायचं असेल, तसंच मीही विचारतो. तुम्ही तुमचं भालाफेकचं प्रशिक्षण आणि तुमचं लैंगिक जीवन कसं संतुलित करता? मला माहित आहे की हा एक चुकीचा प्रश्न आहे, पण त्यामागे एक गंभीर प्रश्न दडला आहे.' राजीव सेठी यांच्या प्रश्नानंतर नीरज नाराज झाला होता. माफ करा, सर असं म्हणून त्याने प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. तुमच्या प्रश्नाने माझं मन भरलं सेठी यांच्या प्रश्नावर पुढे बोलताना नीरज म्हणाला की, माफ करा असं मी म्हटलं आहे. यावरून तुम्हीच जाणून घेऊ शकता. तरीही सेठी यांनी हार मानली नाही, त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावर मुलाखत नियंत्रक म्हणाले की, नीरजला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीय. त्यावेळी सेठी म्हणाले की, मला माहीत होतं. मग नीरज म्हणाला, 'प्लीज सर! तुमच्या प्रश्नाने माझं मन भरून गेलं आहे.' ट्विटरवरून नेटकऱ्यांनी सेठींना सुनावलं नीरजला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारल्यानंतर नेटकऱ्यांनी सेठी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की 'सेक्स लाइफबद्दल विचारून राजीव सेठीला करण जोहरसारखं व्हायचं होतं, पण नीरज चोप्रानं हार्दिक पांड्यासारखं उत्तर न देता त्यांना निराश केलं.' काहींनी म्हटले आहे की, 'जर हे एखाद्या मुलीसोबत घडले असते, तर त्याला लैंगिक शोषण म्हटले गेले असते!' सामान्य लोकांनी नीरजला त्याच्या तयारी आणि संघर्षाबद्दल प्रश्न विचारले असते, सेठी काय विचारत आहेत, असं आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.