
४० हजार रेमडेसिवीर, सात हजार इटोलिझुमॅबची खरेदी महापालिका खर्च करणार सुमारे २१ कोटी रुपये स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रशासनाचा प्रस्ताव म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने नवीन करोना उपचार केंद्रे, ऑक्सिजन प्लांट यासह मोठी तयारी केली आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तब्बल ४० हजार वायल रेमडेसिवीर आणि सात हजार वायल इटोलिझुमॅब इंजेक्शनची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या निविदा आणि संबंधित पुरवठादार कंपन्यांसोबतच्या कराराला स्थायी समितीच्या मंजुरी मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव मांडला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत या दोन्ही इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी पालिकेने इटोलिझुमॅब १०० मिली ग्रॅमच्या सात हजार वायल खरेदी करण्यासाठी एप्रिल महिन्यात पुरवठादार कंपनीसोबत करार केला आहे. प्रती वायल पालिका २६ हजार ७१२ रुपये मोजणार असून सर्व इंजेक्शन खरेदीसाठी १८ कोटी ६९ लाख ८४ हजारांचा खर्च केला जाणार आहे. आतापर्यंत इटोलिझुमॅबच्या ७५० वायल पालिकेने खरेदी केल्या आहेत. आवश्यकतेनुसार उर्वरित इंजेक्शनची खरेदी करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा करार कायम राहाणार आहे. रेमिडेसिवीर या इंजेक्शनसाठीही पालिकेने एप्रिल महिन्यात निविदा मागवल्या होत्या. इंजेक्शनच्या ४० हजार वायल विकत घेण्यासाठी प्रशासनाने संबंधित पुरवठादार कंपनीसोबत करार केला आहे. दोन पुरवठादारांकडून ही खरेदी करण्यात येणार आहे. प्रती वायल ६५० रुपये खर्च असून सर्व इंजेक्शनसाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा खर्च करत आहे. हे इंजेक्शनही पालिकेला ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करून देण्याचा करार झाला आहे. ----- --- इटोलिझुमॅब इंजेक्शन एकूण खरेदी ७,००० वायल प्रतिवायल किंमत २६,७१२ रु. एकूण खर्च १८.६९ कोटी रु. रेमिडेसिवीर इंजेक्शन एकूण खरेदी ४०,००० वायल प्रतिवायल किंमत ६५० रु. एकूण खर्च २.६० कोटी रु. ----- फोटो- ग्राफिक-remdesivir - Ḥक्यूमध्ये पीडीएफ