माथेरानला पोहोचा फक्त २५ रुपयांत; जाणून घ्या सविस्तर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 7, 2021

माथेरानला पोहोचा फक्त २५ रुपयांत; जाणून घ्या सविस्तर

https://ift.tt/3iGJ3K9
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या देवीच्या उत्सवामुळे राज्यात नवचैतन्य आले आहे. याचाच लाभ घेत घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी नेरळ-माथेरान आणि कर्जत-माथेरान ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. एसटीच्या माध्यमातून नेरळवरून अवघ्या २५ रुपयांत माथेरानला पोहोचता येणार आहे. विद्यार्थ्यांना मासिक पासची सुविधादेखील या बसमध्ये मिळणार आहे. करोनानंतर राज्यातील पर्यटन क्षेत्राला भरभराट यावी, यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन 'एसटी संगे पर्यटन' हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईकरांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या येथे पोहोचण्यासाठी कर्जत-नेरळ येथून टॅक्सी घ्यावी लागते. यासाठी जवळपास ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागतात. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि स्थानिकांची मागणी लक्षात घेत एसटी महामंडळाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत आणि नेरळ (खांदा) येथून थेट बस माथेरानसाठी सुटणार आहे. नेरळ-माथेरानसाठी २५ रुपये आणि कर्जत-माथेरानसाठी ४० रुपये असे तिकीट दर असणार आहेत. दोन वर्षांपूर्वी माथेरानमधील अवघड घाटमाथ्यावर सहजपणे चढू शकणाऱ्या दोन नवीन मिडी बस महामंडळाने विकत घेतल्या होत्या. या बस या मार्गावर धावणार आहेत. या बसमध्ये विद्यार्थी पास सुविधादेखील लागू राहणार असून माथेरान-कर्जत मासिक पास ८०० आणि माथेरान-नेरळ मासिक पास ५०० रुपयांचा असणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. टप्प्याटप्प्याने राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांसाठी देखील विशेष एसटी सेवा सुरू करण्याचे नियोजन महामंडळाचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना स्वस्त दरात विश्वासार्ह प्रवासाचा लाभ घेता येणार असल्याने एसटी सेवेला पर्यायाने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मार्ग तिकीट दर विद्यार्थी पास दर माथेरान-कर्जत ४० रुपये ८०० रुपये माथेरान-नेरळ २५ रुपये ५०० रुपये