मुंबईः 'इंधन दराच्या भडक्यासाठी (petrol diesel hike) कधी तेल रोख्यांचे कारण पुढे करुन तर कधी राज्य सरकारांच्या करांकडे बोट दाखवून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांकडून होत असतो. मात्र, केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल- डिझेल दरवाढीचा मूळ दडले आहे,' अशी खरमरीत टीका करत शिवसेनेनं (Shivsena) केंद्रातील मोदी सरकारवर () हल्लाबोल केला आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'विमानाच्या इंधनापेक्षा दुचाकींचे इंधन महाग झाले आहे. इंधनाची ही हवा-हवाई दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. बहोत हो गयी महंगाई की मार अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा मार मुकाट्याने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती दुसरे काय उरले आहे?,' असा सवालही शिवसेनेनं केला आहे. 'काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरुद्ध कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचाः ''पेट्रोल-डिझेल सस्ता चाहिए की नहीं चाहिए?' असे सवाल निवडणुकींच्या प्रचार सभांतून उपस्थित करत भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली, तेव्हा देशात पेट्रोल ७२ रुपये तर डिझेल ५४ रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात होते. आज पेट्रोल-डिझेल शंभरी ओलांडून पुढे गेले, विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झाले. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे, पण तेव्हाचे तमाम आंदोलनकर्ते आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत हे कळण्यास मार्ग नाही,' असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे. वाचाः 'यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर प्रतिबॅरल म्हणजे सध्याच्या दरांपेक्षा दुपटीने महाग होते, तरी पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे कधीच सरकले नाहीत. कठीण परिस्थितीतही इंधनाचे दर आटोक्यात ठेवणाऱया मनमोहन सिंगांवर वाटेल तशी चिखलफेक करणारी मंडळी आज सत्तेत आहे.यूपीए राजवटीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात जवळपास निम्म्यावर आले. तरीही पेट्रोल-डिझेलच्या इंधनाचे दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस का वाढत आहेत, या प्रश्नाचे नेमके उत्तर केंद्रीय सरकारचे प्रवक्ते कधीच देत नाहीत,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे.