मोखाडा तालुक्यातील शेतकर्‍यांची गैरसोय पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 2, 2021

मोखाडा तालुक्यातील शेतकर्‍यांची गैरसोय पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे

मोखाडा तालुक्यातील पशुधनाची देखभाल करणार्‍या पशुवैद्यकीय विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे पशुधन शेतकरी संकटात सापडला आहे.


मोखाडा तालुका सर्वार्थाने मागासलेला व दुर्गम डोंगराळ भागात असल्यामुळे या तालुक्याकडे शासकिय अधिकारी व लोकप्रतिनीधी याचे फारसे लक्ष नाही, असे म्हणावे लागेल. एकंदरीत तालुक्यात श्रेणी १ ची मोखाडा, खोडाळा आणि वाशाळा येथे तर श्रेणी 2 ची बेरिस्ते, सुर्यमाळ आणि कारेगाव या सहा ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या सर्व दवाखान्यांचे कार्यक्षेत्र हे विस्तारीत असून डोंगर दरीत आणि लांबपल्याचे आहे. त्यामुळे एखाद्या जनावरांचा उपचार करायचा झाल्यास पूर्ण दिवस एकाच जनावरांसाठी घालवावा लागतो. त्यातच कर्मचारी संख्या कमी असल्याने वेळप्रसंगी दवाखाने बंद ठेवण्याची नामुष्की कर्मचार्‍यांवर ओढावत आहे. 

आदिवासीबहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. यंदा पावसाचा लहरीपणा व ऐनवेळी जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर पडली होती. त्यातच शेळी व दुधदुभती जनावरेसुद्धा आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पशुधन शेतकर्‍यांवर दुहेरी संकट कोसळले असताना पशुधनास वेळीच उपचार करण्याची गरज होती. परंतु कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे अनेक पशुधन मालकांना पशुधन वैद्यकीय अधिकार्‍यांची चातकासारखी वाट बघावी लागते हे कृषी प्रधान देशातील पशुधन शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे.