बँक ऑफ बडोदा घोटाळा : सीबीआयने ६ जणांना केली अटक, - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 28, 2021

बँक ऑफ बडोदा घोटाळा : सीबीआयने ६ जणांना केली अटक,

https://ift.tt/2ZuxZtr
नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदामधील ६००० कोटी रुपयांच्या परकीय चलन प्रेषण (रेमिटन्स) घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी (२७ ऑक्टोबर) सहा जणांना अटक केली. २०१५ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने १४ ठिकाणी छापेही टाकले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीबीआयचे प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी सांगितले की, एजन्सीने बँक ऑफ बडोदाचे तत्कालीन एजीएम आणि बँकेचे तत्कालीन विदेशी विनिमय अधिकारी यांच्याविरुद्ध १२ डिसेंबर २०१५ रोजी विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने बुधवारी या प्रकरणातील चालू तपासासंदर्भात तनुज गुलाटी, ईश भुतानी, उज्ज्वल सुरी, हनी गोयल, साहिल वाधवा आणि राकेश कुमार या सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बँक ऑफ बडोदाच्या अशोक विहार शाखेतून ५९ चालू खातेदारांनी दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये 'अस्तित्वात नसलेल्या' आयातीसाठी कथित पेमेंटच्या नावाखाली ६००० कोटींहून अधिक रक्कम पाठवली होती. त्याबद्दल एजन्सीने २०१५ मध्ये अनेक बँक अधिकारी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, एजन्सीला असे आढळून आले आहे की, अशोक विहार शाखा तुलनेने नवीन शाखा होती आणि तिला २०१३ मध्येच परकीय चलनात व्यवहार करण्याची परवानगी मिळाली होती. १ लाख डॉलरपेक्षा कमी रक्कम जुलै २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत सुमारे ८,००० व्यवहारांद्वारे ६००० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. प्रत्येक व्यवहारात पाठवलेली रक्कम एक लाख यूएस डॉलरपेक्षा कमी ठेवण्यात आली होती. एफआयआर नोंदवल्यानंतर एका अधिकाऱ्याने सांगितले की, "ही सर्व रक्कम हाँगकाँगला पाठवण्यात आली होती. आयातीसाठी आगाऊ म्हणून ही रक्कम पाठवण्यात आली होती आणि बहुतेक प्रकरणांमध्ये लाभार्थी एकच होता."