अमली पदार्थ दलालाचे क्रिप्टो खाते गोठवले; देशातील पहिली घटना मुंबईत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 18, 2021

अमली पदार्थ दलालाचे क्रिप्टो खाते गोठवले; देशातील पहिली घटना मुंबईत

https://ift.tt/3nsTLa6
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी क्रिप्टो चलनाचा वापर करणाऱ्या दलालाविरुद्ध नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) मोठी कारवाई केली आहे. मकरंद प्रदीप अडिवीरकर या दलालाचे क्रिप्टो चलनाचे खाते गोठविण्यात 'एनसीबी'ला यश आले आहे. विशेष म्हणजे, आशाप्रकारे परदेशातील क्रिप्टो खाते गोठवण्याची देशातील ही पहिलीच घटना ठरली आहे. एनसीबी मुंबईने काही महिन्यांपूर्वी मकरंद अडिवीरकर या अमली पदार्थाच्या दलालाला अटक केली होती. मकरंद हा क्रिप्टो बाजारात बिटकॉइनची खरेदी-विक्री करीत होता. स्थानिक पातळीवरील दलालांकडून पैसे घेत ती रक्कम बिटकॉइन खरेदीसाठी वापरायचा. या बिटकॉइनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारातून अमली पदार्थ खरेदी करायचे व त्याची पुन्हा मुंबईतील स्थानिक बाजारात दलालांना विक्री करायची, अशाप्रकारे त्याचे नेटवर्क सुरू होते. यामुळेच अडिवीरकरला अमली पदार्थाच्या बाजारात 'क्रिप्टो किंग' म्हणून ओळखला जात होता. एनसीबीने काही महिन्यांपूर्वी गुप्त माहितीच्या आधारे त्याला 'एलएसडी' या अमली पदार्थांसह अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात अडिवीरकरच्या क्रिप्टो खरेदीबाबत आणखी माहिती समोर आली. अडिवीरकरचे केमॅन आयलंड देशातील बीनान्स या क्रिप्टो बाजारात खाते होते. त्या खात्यातील क्रिप्टो चलनाचा उपयोग करूनच तो अमली पदार्थांची तस्करी करीत होता, असे एनसीबी मुंबईच्या तपासात समोर आले. त्यामुळे हे खाते गोठवणे अत्यावश्यक होते. त्यानुसार एनसीबीने नरिमन पॉइंट येथील तस्करी व परकीय चलन गैरव्यवहार कायद्याच्या (साफेमा) सक्षम प्राधिकरणाकडे विनंती केली होती. या प्राधिकरणाने अडिवीरकरच्या या खात्याची सर्व माहिती काढून अखेर ते खाते गोठवले.