
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतून करोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग आता जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी या व्हायरस प्रभावित देशांमधील नागरिकांच्या प्रवासावव निर्बंध घातले आहेत. भारतातही दक्षता वाढवण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हायरसबद्दल एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही चिता व्यक्त केली आहे. कारण ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ३० हून अधिक म्युटेशन म्हणजे बदल झाले आहेत. यामुळे लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ३० हून अधिक म्युटेशन झाले आहेत. यामुळे ओमिक्रॉन लसवरही मात करू शकतो. बहुतेक लस स्पाइक प्रोटीनच्या विरूद्ध प्रतिकारशक्ती तयार करून काम करतात. यामुळे ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये झालेले अनेक बदल COVID-19 लसींचा प्रभाव कमी करू शकतात, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. लस किती प्रभावी? याचा गांभीर्याने तपास व्हायला हवा- डॉ. गुलेरिया करोनाच्या या नवीन प्रकारात लस किती परिणामकारक आहे, याचा गांभीर्याने तपास व्हायला हवा, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. स्पाइक प्रोटीनची उपस्थिती मानवी शरीरात व्हायरसच्या प्रवेशास सुलभ करते आणि त्यास पसरण्यास आणि संसर्ग निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. करोना व्हायरसच्या नवीन प्रकारात स्पाइक प्रोटीनमध्ये ३० हून अधिक बदल झाले आहेत आणि त्यामुळे मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून बचावाची क्षमता व्हायरसमध्ये विकसित होण्याची शक्यता आहे, असे एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. 'सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष' या पार्श्वभूमीवर भारतात दिल्या जाणार्या लसींसह इतर लसींच्या परिणामकारकतेचे गंभीरपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. व्हायरसचा प्रसार, तीव्रता आणि प्रतिकारशक्ती टाळण्याची क्षमता यावर अधिक तपशीलवार माहिती समोर आल्यावर पुढील कारवाई अवलंबून असेल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आणि ज्या भागात अचानक रुग्णांची संख्या वाढली आहे, अशा दोन्ही ठिकाणी अत्यंत सतर्क राहण्याची आणि आक्रमक पाळत ठेवण्याची गरज, यावर डॉ. गुलेरिया यांनी भर दिला. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे कोविड योग्य वर्तनाचे पालन करावे आणि आपली सुरक्षा कमी करू नये. लसीचे दोन्ही डोस नागरिकांना दिले जावेत आणि ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांना ती घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारचा इशारा दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोस्टवाना येथून येणार्या किंवा जाणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी आणि चाचणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांचे नमुने निश्चित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये त्वरित पाठवले जावेत, असे पत्रात म्हटले आहे.