परमबीर सिंह यांना चित्रांतही स्थान नाही; आयुक्तालयातील मानाच्या परंपरेतून बेदखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 19, 2021

परमबीर सिंह यांना चित्रांतही स्थान नाही; आयुक्तालयातील मानाच्या परंपरेतून बेदखल

https://ift.tt/3CvJJsX
मटा विशेष dipesh.more@timesgroup.com tweet@dipeshmoreMT मुंबईचे पोलिस आयुक्त व्हावे असे प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याचे स्वप्न असते. त्यानंतर पोलिस आयुक्तालयाच्या पुरातन वास्तुचा दर्जा मिळालेल्या इमारतीमध्ये छायाचित्राच्या स्वरूपात मिळणारा मान वेगळाच असतो. मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करणाऱ्या यांची प्रतिमा मात्र आयुक्तालयातून गायब झाली आहे. त्यांचे छायाचित्र लावण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे असे अधिकारी सांगत असले तरी अनेक गुन्ह्यांत आरोपी तसेच न्यायालयानेही फरार घोषित केल्यामुळे त्यांचे छायाचित्र आठ महिन्यानंतरही लावले नसल्याची चर्चा पोलिस मुख्यालयात रंगली आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची १७ मार्च रोजी आयुक्तपदावरून उचलबांगडी करून आयुक्तपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्यावर सोपवण्यात आली. आयुक्तपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचे छायाचित्र काळ्या रंगाच्या लाकडी चौकटीत आयुक्त कार्यालयातील भिंतीवर लावण्याची परंपरा आहे. स्वातंत्र्यानंतर मुंबईचे पहिले पोलिस आयुक्त जे. एस. भरुचा यांच्यापासून ते परमबीर यांच्याआधीचे आयुक्त संजय बर्वे अशा ४२ तत्कालीन आयुक्तांची छायाचित्रे मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये लावण्यात आली आहेत. मात्र यातून परमबीर सिंह यांचे छायाचित्र गायब आहे. आठ महिने उलटूनही त्यांचे छायाचित्र दिसत नसल्याने पोलिस आयुक्तालयात उलटसुलट चर्चा सुरू आहे. योगायोग की अन्य काही... परमबीर यांच्या छायाचित्राची फ्रेम का लावण्यात आली नाही याबाबत उघडपणे कुणीही अधिकारी बोलत नाही. मात्र ४२ माजी पोलिस आयुक्तांची छायाचित्रे इमारतीच्या तळमजल्यावर एकाच मापाच्या फ्रेममध्ये एका रांगेत लावण्यात आली आहेत. संजय बर्वे यांच्या छायाचित्राच्या शेजारी फार कमी जागा आहे. भिंतीच्यापुढे दगडी खांब आहे. अपुरी जागा असतानाही परमबीर यांना आयुक्तपदावरून हटविल्यानंतर या जागेत छायाचित्र बसवण्याचा प्रयत्न झाला. परंतु भिंत सोडून हे छायाचित्र दगडी खांबावर येत असल्याने ते बरे दिसत नव्हते. आधीच्या ४१ आयुक्तांच्या छायाचित्रांतील अंतर कमी केल्यानंतरही त्यासाठी जागा होत नव्हती. त्यामुळे त्यांच्या छायाचित्राची फ्रेम काढण्यात आली. आठ महिन्याच्या कालावधीत परमबीर यांच्या छायाचित्रास जागा मिळालेली नाही आणि खंडणीचे पाच गुन्हे दाखल असलेल्या परमबीर यांना न्यायालयाने फरार घोषित केले. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रासाठी जागा न मिळणे हा योगायोग आहे की अन्य काही यावर चर्चा सुरू आहे. नवीन जागेचा शोध तळमजल्यावरील भिंतीवर जागा नसल्याने परमबीर यांच्यासाठी नवीन जागेचा शोध सुरू आहे. पहिल्या मजल्यावर छायाचित्र लावण्याबाबत विचार करण्यात आला. मात्र पहिल्या मजल्यावर आयुक्तांचे कार्यालय असून या ठिकाणी त्यांना अनेकजण भेटण्यासाठी येतात. ज्या अधिकाऱ्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे त्याचे छायाचित्र पोलिस आयुक्त कार्यालयाच्या बाजुला योग्य वाटणार नाही. त्यामुळे नवीन जागेचा शोध सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.