
दुबई: न्यूझीलंड क्रिकेट संघाचे टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने त्याचा ८ विकेटनी पराभव केला. विजयासाठी न्यूझीलंडने दिलेले लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सात चेंडू राखून सहज पार केले. न्यूझीलंडचा मर्यादित षटकांच्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये झालेला हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. त्यांना मोठ्या स्पर्धेत कधीच ऑस्ट्रेलियावर विजय मिळवता आला नाही. न्यूझीलंडचा २०१५च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या वनडे फायनलमध्ये इंग्लंडने आणि आता २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये त्यांचा पराभव केला. वाचा- फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडने टॉस गमावला तेथेच अर्धी लढत गमावली होती. या स्पर्धेत ज्या संघांनी प्रथम गोलंदाजी केली आहे त्यांनीच अधिक तर विजय मिळवला आहे. पण त्यानंतर देखील त्यांना विजय मिळवण्याची संधी होती. जाणून घेऊयात अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे न्यूझीलंडचा पराभव झाला. वाचा- खराब सुरुवात- न्यूझीलंडला अंतिम सामन्यात जशी सुरूवात हवी होती तशी मिळाली नाही. सलामीचा फलंदाज डॅरिल मिशेल ८ चेंडूत ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या केन विलियमसनसोबत सलामीवीर मार्टिन गप्टिलने संघाला अर्धशतक करून दिले. मार्टिनच्या संथ फलंदाजीचा फटका न्यूझीलंडला बसला. त्याने ३५ चेंडूत फक्त २८ धावा केल्या. मार्टिन बाद झाला तेव्हा न्यूझीलंडने ११.१ षटकात ७६ धावा केल्या होत्या. मार्टिन सोबत ग्लेन फिलिप्सला १७ चेंडूत १८ धावा करत आल्या. या दोन फलंदाजांनी वेगाने धावा केल्या असत्या तर न्यूझीलंडला २००च्या पुढे जाता आले असे. केनने ४८ केलेल्या ८५ धावांमुळे त्यांना १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. टी-२० वर्ल्डकपच्या फायनल मॅच मधील सर्वाधिक धावसंख्या उभी केल्यानंतर न्यूझीलंडकडे विजयाची संधी होती. यासाठी त्यांना सुरुवातीला विकेट मिळवण्याची गरज होती. ट्रेंट बोल्टने तशी सुरूवात देखील करून दिली. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला ५ धावांवर बाद करून जबरदस्त सुरुवात करून दिली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यात न्यूझीलंडला अपयश आले. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी आक्रमक फलंदाजी केली. यावर अंकूश ठेवता आला नाही. बोल्टने वॉर्नरला ५३ धावांवर बाद करून दुसरे यश मिळवून दिले होते, तोपर्यंत फार उशिर झाला होता.