
नवी दिल्लीः संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने मोठी माहिती दिली आहे. गेल्या ५ वर्षात ६ लाखांहून अधिक नागरिकांनी भारताचे नागरिकत्व ( ) सोडले आहे. हे नागरिक विदेशात स्थायिक झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. लाखो नागरिकांनी भारत सोडला असून ते विदेशात स्थायिक झाले आहेत. सध्या विदेशात किती भारतीय नागरिक रहात आहेत, याची माहितीही सरकारने दिली. विदेशात सध्या १,३३, ८३,७१८ भारतीय विविध देशांमध्ये रहात आहेत, अशी माहिती सरकारने दिली. लोकसभेत सरकारने एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. यानुसार २०१७ मध्ये १,३३,०४९ नागरिकांनी भारत सोडला. २०१८ मध्ये १,३४,५६१ नागरिकांनी, २०१९ मध्ये १.४४,०१७ नागरिकांनी, २०२० मध्ये ८५,२४८ नागरिकांनी आणि या वर्षात ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत १,११,२८७ भारतीयांनी नागरिकत्व सोडले, अशी माहिती सरकारने दिली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये सर्वाधिक भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले. तर २०२० मध्ये सर्वात कमी भारतीयांनी नागरिकत्व सोडल्याचं दिसून येतंय. पण त्यांनी किंवा विदेशात स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला? हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.