हलक्या सरींमुळे उकाड्यावर फुंकर; आर्द्रता, गर्मीने हैराण मुंबईकरांना दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 22, 2022

हलक्या सरींमुळे उकाड्यावर फुंकर; आर्द्रता, गर्मीने हैराण मुंबईकरांना दिलासा

https://ift.tt/ZAhU0kg
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास काही भागांमध्ये हलक्या सरींनी हजेरी लावली आणि वातावरणात किंचित पावसाळी गारवा जाणवला. आर्द्रता आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे अल्प दिलासा दिला. वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे किमान तापमान २८.५वर पोहोचले, तर कुलाबा येथे २७.४ किमान तापमानाची नोंद झाली. शुक्रवारीही सांताक्रूझ येथे किमान तापमान २९ अंश सेल्सिअस होते. तर कुलाबा येथे २७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. मुंबईतील अंशतः ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. कोकणामध्ये काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे अंदमाननंतर राज्यात आणि मुंबईतही पावसाचे आगमन लवकर होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र पश्चिम किनाऱ्यावर ३ जूननंतर पावसाचा जोर वाढलेला असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतरच पावसाच्या पुढील प्रवासाचा अंदाज दिला जातो. गुरुवारी जारी झालेल्या येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ३ जूनच्या आधी मुंबईमध्ये फारशा पावसाची शक्यता नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईपर्यंत पूर्वमौसमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या गारव्याचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. आर्द्रतेमुळे उकाडा मात्र अधिक जाणवण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किमान तापमान २७ ते २८ अंशांदरम्यान असण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये अखेरच्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा चढाच असतो. सन २०१५मध्ये किमान तापमान २९.७ अंशांपर्यंत पोहोचले होते. या काळात मुंबईत फारसा पाऊस नसतो. त्यामुळे एखाद्-दुसऱ्या हलक्या सरीमुळेही अस्वस्थता कमी होण्यासाठी मदत होते. मुंबईचे कमाल तापमान शनिवारी सांताक्रूझ येथे ३४.४, तर कुलाबा येथे ३३.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सरासरीच्या आसपास आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मात्र पावसाच्या उपस्थितीमुळे किमान आणि कमाल दोन्ही तापमानामध्ये घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरी तापमानापेक्षा घट नोंदली गेली आहे. मध्य महाराष्ट्रात पावसानंतर शुक्रवारच्या तुलनेत काही ठिकाणी कमाल तापमान पुन्हा चढले असले तरी हे तापमान सरीसरीपेक्षा मात्र कमी आहे. येत्या आठवड्याच्या मध्यापर्यंत कोकणातील तुरळक ठिकाणे वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता फारशी नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.