गृहउभारणीतून विकासकांना नऊ हजार कोटींचा फायदा?; काय आहे प्रकरण? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 20, 2022

गृहउभारणीतून विकासकांना नऊ हजार कोटींचा फायदा?; काय आहे प्रकरण?

https://ift.tt/SM6X5IH
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः 'मुंबई महापालिकेतर्फे प्रकल्पग्रस्तांसाठी भांडुप, मुलुंड, वरळी, चांदिवलीमध्ये सुमारे १४ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा बांधकाम खर्च सुमारे साडेतीन हजार कोटी असून बांधकामाच्या बदल्यात विकासकांना टीडीआर, प्रीमियम व क्रेडिट नोटपोटी तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा फायदा पालिका करून देणार आहे. रेडीरेकनर दरापेक्षाही अधिक दर लावून विकासक पालिकेची फसवणूक करत आहेत', असा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी केला. पालिकेतर्फे रस्तेकामे, नाले रुंदीकरण, उड्डाणपूल यासह विविध प्रकारची विकासकामे केली जातात. या कामांदरम्यान हजारो नागरिक आणि दुकाने विस्थापित होतात. या प्रकल्पग्रस्तांसाठी घरबांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मंजूर केलेल्या प्रकल्पांतील टीडीआर, प्रीमियम, क्रेडिट नोटमधून संबंधित विकासकांना फायदा करून देण्यासाठी पालिकेने पायघड्या अंथरल्याचा दावा राजा यांनी केला. काँग्रेसने लोकायुक्त, पालिका आयुक्त, केंद्रीय दक्षता समिती यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केल्याचे राजा यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत पालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी पालिका जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विरोधकांच्या मते, असे आहे लाभाचे गणित भांडुप पश्चिम येथे 'न्यू वर्ल्ड लँडमार्क एलएलपी'तर्फे १,९०३ घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी १६० कोटी रुपये बांधकाम खर्च असून विकासकास ३९ हजार चौरस फूट दराने टीडीआर, क्रेडिट नोटमधून ७४२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जमीन विकासकाची असली तरी रेडीरेकनर दरानुसार ६२७.३८ कोटी द्यायला हवेत. यामध्ये विकासकास ११७५ कोटी इतका फायदा होईल. मुलुंड पूर्व येथे 'स्वास कन्स्ट्रक्शन'तर्फे ७,४३९ घरे बनविण्याची योजना असून त्यासाठी प्रत्येक घरामागे विकासकास प्रति चौरस फूट ३८ हजार बांधकाम दराने टीडीआर, क्रेडिट नोट दिले जाणार आहे. जमीन विकासकाची असून रेडीरेकनर दरानुसार जमिनीचे ६५० कोटी, बांधकाम टीडीआर ७८० कोटी होते. विकासकास एकूण ७४६३ कोटी मिळणार असून पालिकेचे ४११४ कोटींचे नुकसान होणार आहे. चांदिवलीतील प्रकल्पासाठी 'डीबी रिअॅलिटीस' ४ हजार घरे बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी प्रति चौरस फूट ३५ हजार रुपये रक्कम, टीडीआर, क्रेडिट नोट देण्यात येणार आहे. येथे विकासकास २,१२३ कोटी ८१ कोटी रु.चा फायदा होणार आहे. माहीम येथे 'क्लासिक प्रमोटर्स अँड बिल्डर'तर्फे ५२९ घरे बांधली जात असून त्यांचे क्षेत्रफळ ३,३१७ चौरस मीटर आहे. त्याठिकाणी प्रत्येक घराची किमत आणि क्रेडिट नोट, टीडीआर, जमिनीची किंमत आदी सर्व हिशेब केल्यास तिथे विकासकास ६८० कोटी ९१ लाख रुपयांचा लाभ होणार आहे.