
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः राज्यामध्ये करोनारुग्णांच्या संख्येमध्ये थोडी वाढ दिसत असल्याने, सरकारच्या आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सिनेमागृहे, सभागृहे, कार्यालयांधील बंदिस्त ठिकाणी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणे आवश्यक आहे. त्याच वेळी, करोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने ती वाढवावी. हे प्रमाण सध्या असलेल्या चाचण्यांपेक्षा दुप्पट करावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. 'आयएलआय' आणि 'सारी' या स्वरूपाच्या लक्षणांच्या सर्वेक्षणात सुधारणा करावी, तसेच एका क्लस्टरमध्ये तीन ते सात रुग्ण आढळले, तर लगेच जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठवावेत. 'पीएसए प्लान्टस्'चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच तयार केलेले ऑक्सिजन स्टोरेज भरून ठेवावेत याकडेही आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे. लसीकरणाचा वेग खाली आला असून, त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. राज्य हे सर्व गटांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत सरासरीपेक्षा खाली आहे. नवीन रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर करोनाव्यतिरिक्त सुविधा सुरू ठेवण्यासाठी योजना तयार ठेवणे तसेच त्वरित प्रतिक्रिया म्हणून सरकारी रुग्णालयांना करोना रुग्णालयामध्ये बदलू नये. रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहील, अशी शक्यता असल्याने काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये रुग्णांना एकत्र करता येईल का यादृष्टीने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक व फायर ऑडिटच्या वेळी सांगितल्या गेलेल्या कामांसाठी डीपीडीसी किंवा इतर स्थानिक स्रोतांमधून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या सात दिवसांतील रुग्णसंख्या जिल्हा ४ ते १० मे २७ एप्रिल ते ३ मे वाढ मुंबई ८४४ ६३७ ३२.५० पुणे २८१ २२२ २६.५८ ठाणे १७० ११४ ४९.१२ रायगड २४ २६ ७.६९ अहमदनगर १८ १७ ५.८८ पहिले पाच जिल्हे १,३३७ १,०१६ ३१.५९ राज्य १, ४४७ १,०९७ ३१.९१ सरासरीपेक्षा अधिक साप्ताहिक पॉझिटिव्हिटी बुलडाणा - २.२३ औरंगाबाद - २.१२ मुंबई - १.७९ पुणे - १.६५ नांदेड - १ राज्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी - एक टक्का