
नवी दिल्ली : दिल्लीच्या संघात करोनाचा स्फोट झाला तेव्हा मोठा धक्का मिचेल मार्शलाही बसला होता. पण मार्शने फक्त करोनालाच हरवले नाही तर राजस्थानला एकहाती पराभूत करत तो सुपर हिरो ठरला. मार्शने ६२ चेंडूंत पाच चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ८९ धावांची वादळी खेळी साकारली, त्याचबरोबर गोलंदाजी दोन महत्वाच्या विकेट्स मिळवल्या आणि दिल्लीसाठी तो विजयाचा नायक ठरला. राजस्थानने दिल्लीपुढे १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला दुसऱ्या चेंडूर पहिला धक्का बसला होता. पण त्यानंतर मैदानात वादळ आले ते मिचेल मार्शचे. मार्शने यावेळी फक्त दिल्लीच्या संघाला सावरले नाही तर विजयही मिळवून दिला. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ही ऑस्ट्रेलियाची जोडगोळी यावेळी मैदानात चांगलीच फटकेबाजी करत होता. मार्श आणि वॉर्नर या जोडीने दिल्लीसाठी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १४४ धावांची भागीदारी रचली. दिल्लीला विजयासाठी फक्त १७ धावा असताना मार्श आऊट झाला आणि हा विजयाचा नायक तंबूत परतला. त्यानंतर वॉर्नर आणि कर्णधार रिषभ पंत यांनी यावेळी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉर्नरने यावेळी ४१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५२ धावा फटकावल्या, तर पंतने चार चेंडूंत दोन षटकारांच्या जोरावर नाबाद १३ धावा केल्या. या विजयासह दिल्लीच्या संघाने आयपीएलमधील आपाल सहावा विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीच्या संघाने आता १२ गुण पटकावत प्ले ऑफच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. दिल्लीचे या विजयासह १२ गुण झाले असून ते पाचव्या स्थानावर कायम आहेत. दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकत यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत योग्य असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे राजस्थानच्या आर. अश्विन आणि देववदत्त पडीक्कल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाला मोठी खेळी साकारता आली नाही. राजस्थानच्या संघाने आर. अश्विनचे अर्धशतक आणि देवदत्त पडीक्कलच्या ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या उभारली. या दोघांच्या खेळींच्या जोरावर राजस्थानला दिल्लीपुढे विजयासाठी १६१ धावांचे आव्हान ठेवता आले.