भारतीय संघात नसतानाही जसप्रीत बुमराला आयसीसीने दिले खास गिफ्ट, पोस्ट झाली व्हायरल... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 11, 2022

भारतीय संघात नसतानाही जसप्रीत बुमराला आयसीसीने दिले खास गिफ्ट, पोस्ट झाली व्हायरल...

https://ift.tt/2ueobnU
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या भारताच्या संघात नाही. पण तरीही त्याला आयसीसीने एक खास गिफ्ट दिले आहे. बुमराने ही गोष्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. बुमराचे यावर्षी आयपीएलमध्ये प्रमोशन झाले होते. बुमरा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार होता. पण मुंबई इंडियन्सच्या संघाला सर्वात पहिल्यांदाच आयपीएमधून गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्वेन्टी-२ मालिका होणार होती. पण बुमराने विश्रांतीचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच तो या मालिकेत आपल्याला खेळताना दिसत नाही. पण बुमरा या सामन्यात खेळत नसला तरी त्याला एक खास गिफ्ट आयसीसीने पाठवले आहे. आयसीसीने २०२० साली क्रिकेटच्या सर्व प्रकारामधील १० वर्षांतील सर्वोत्तम संघाची घोषणा केली होती. यावेळी ट्वेन्टी-२० या प्रकारात भारताच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. या यादीमध्ये बुमराबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचे नाव होते. धोनीला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. या घोषणेच्या १८ महिन्यांनंतर आयसीसीने बुमराला आता या संघाची कॅप पाठवली आहे आणि हा त्याच्यासाठी एक मोठा सन्मान आहे. याबाबत बुमराने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये बुमराने लिहिले आहे की, " आयसीसी तुम्ही हा जो माझा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे." ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बुमराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुमराने २०१६ साली ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत बुमराने ५७ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत, या ५७ सामन्यांमध्ये बुमराने ६.५१च्या इकॉनॉमीने ६७ फलंदाजांना माघारी धाडले आहे. बुमराने फेब्रुवारी महिन्यात आपला अखेरचा ट्वेन्टी-२० सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आयपीएलला सुरुवात झाली. आयपीएलमधून मुंबईचा संघ बाहेर पडला आणि त्यानंतर बुमराने विश्रांती घेतली असून तो आता थेट इंग्लंडच्या दौऱ्यात खेळणार असल्याचे समजते आहे.