...तर सरकार प्रचंड अडचणीत येईल!, कसे आहे विधान परिषदेचे गणित? पाहा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 19, 2022

...तर सरकार प्रचंड अडचणीत येईल!, कसे आहे विधान परिषदेचे गणित? पाहा...

https://ift.tt/WKTkQFy
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची झाली आहे. सोमवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेप्रमाणेच भाजपचा पाचवा उमेदवार जिंकला, तर राज्य सरकार प्रचंड अडचणीत येणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सध्या ११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण २६ मतांचा कोटा आवश्यक असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार जिंकण्यास फारसा त्रास होऊ नये, असे कागदावरचे गणित सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात ११ मधील कोणता उमेदवार रिंगणाबाहेर जाणार, हे कोणत्या पक्षांच्या मतांची फूट अधिक होते, यावर अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. शिवसेनेचे अंधेरीचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे २८८ पैकी २८५ जणांचेच मतदान होणार आहे. त्यातही एखाद वेळेस बहुजन विकास आघाडीचे तीनपैकी दोनच उमेदवार मतदान करण्याची शक्यता आहे. भाजप आमदारांची संख्या १०६ असून त्यांच्या चार उमेदवारांसाठी १०४ मते त्यांना द्यावी लागणार आहेत. त्यांना आठ अपक्षांचा पाठिंबा आहे. मात्र भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांना केवळ २६चाच कोटा पक्षाकडून दिला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पाचवे प्रसाद लाड यांच्या पारड्यात आलीच तर अवघी पाच ते सहा मते पक्षाकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जवळपास २० मतांची बेगमी करावी लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना नऊ ते १२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यामुळे संख्याबळानुसार आज तरी जगताप यांचे पारडे जड वाटत असले तरी गुप्त मतदानात कुणाकुणाची मते कुठे जातील, याचा अंदाज एकही राजकीय पंडित वर्तवू शकत नसल्यामुळे सगळेच पक्ष आमदारांना खूश करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. ...तर सरकारची मोठी नामुष्की राज्य विधिमंडळात अपक्ष व छोटे-मोठे पक्ष यांची १५ मते आहेत. विधान परिषद निवडणुकीत ती सगळीच्या सगळी भाजपला मिळणे शक्य नाही. मात्र त्यातील बहुतांश मते मिळवण्याचा भाजप जोरदार प्रयत्न करणार यात वाद नाही. मात्र जवळपास २० मते हवी असतानाही जर भाजपचे प्रसाद लाड या निवडणुकीत जिंकले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण या सगळ्या दिग्गजांसाठी ती मोठी नामुष्कीच असणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील असंतुष्ट आमदारांना खूश करण्याचे विविध मार्ग भाजपकडे असल्याने त्याचेही जोरदार प्रयत्न होणार, याची सगळ्यांनाच खात्री आहे. मात्र गुप्त मतदान असल्यामुळे भाजपचीही सगळीच्या सगळी मते त्यांच्याच उमेदवाराला पडतील, याचीही शाश्वती नाही. त्यामुळे चारही बाजूंनी उलट सुलट मतांची फूट होण्याचीच शक्यता बहुतांश राजकीय जाणकारांना वाटते आहे. फडणवीसांचे बळ वाढण्याची धास्ती राज्याची सत्ता हातात असताना जर फडणवीस एकहाती सत्ताधारी पक्षाची इतकी मते फोडू शकले तर यापुढे त्यांचा राजकीय क्षेत्रात दरारा तयार होणार असल्याचे सत्ताधारी पक्षातील नेतेही मान्य करत आहेत. तसे झाल्यास यापुढे सरकारच्या प्रत्येक कृतीच्या विरोधात फडणवीस अधिकाधिक आक्रमक तर होतीलच, पण सत्ताधारी आमदारांमधील अस्वस्थतेलाही लवकरच तोंड फोडून ते राज्याला सत्ता बदलाच्या दिशेनेही घेऊन जाण्याची शक्यता या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणणे ही काँग्रेस नेत्यांची जबाबदारी असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसचा दुसरा उमेदवार पडल्यास सरकारसमोर येणाऱ्या नामुष्कीला तोंड देणे अशक्य असल्याने अजित पवारही काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा उमेदवार जिंकून यावा, यासाठी मदत करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.