
अहमदाबाद : गुजरातच्या बोताडमध्ये बनावट दारुमुळं ९ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट दारु पिल्यानं अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी देखील ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोताडमध्ये बनावट दारु पिणाऱ्या व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. गुजरातमधील आगामी निवडणुकांमध्ये दारुबंदी हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित लोकांनी दारु कशी मिळवली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पोलिसांनी देखील याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी या घटनेबाबत सविस्तर पत्रक जारी केलं जाईल, असं म्हटलं आहे. बोताडमध्ये ९ जणांचा मृत्यू बोताडमध्ये ९ बनावट दारु पिल्यानं ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तर, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय, डॉक्टरांनी उपचार सुरु केले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुकामध्येही बनावट दारु पिल्यानं अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत बनावट दारुचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झालीय. आम आदमी पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये दारुबंदी असून देखील अवैध दारुविक्री केली जात असल्याचा आरोप केला. गुजरातमध्ये अवैध दारुविक्री करणारे कोण आहेत, असा सवाल केला. गुजरातमध्ये बनावट दारुमुळं मृत्यू होण्याच्या घटना कमी प्रमाणात घडतात. बिहारमध्ये होळीचा उत्सव साजरा करताना तीन जिल्ह्यांमध्ये २५ लोकांचा बनावट दारुमुळं मृत्यू झाला होता. विशेष बाब म्हणजे गुजरात प्रमाणं बिहारमध्ये देखील दारुबंदी लागू करण्यात आलेली आहे.