शिंदे- फडणवीसांचा एका विमानाने दिल्लीप्रवास; निमित्त स्नेहभोजनाचे, चर्चा मात्र खातेवाटपाची - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 23, 2022

शिंदे- फडणवीसांचा एका विमानाने दिल्लीप्रवास; निमित्त स्नेहभोजनाचे, चर्चा मात्र खातेवाटपाची

https://ift.tt/GiqnAXR
एका विमानाने दिल्लीप्रवास; निमित्त स्नेहभोजनाचे, चर्चा खातेवाटपाची म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथे शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून शुक्रवारी सायंकाळी रवाना झाले. या दिल्लीवारीमागे स्नेहभोजनाचे निमित्त असले तरी प्रत्यक्षात या भेटीदरम्यान राज्यातील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाविषयी भाजपच्या केंद्रातील नेत्यांशी अंतिम चर्चा होणार असल्याचे कळते. त्यामुळे शनिवारी दिल्लीतून परतणारे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते विस्ताराची बातमीच घेऊन येतील, अशी आशा शिंदे गट तसेच भाजपमधील इच्छुकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोविंद यांच्या सन्मानार्थ दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी देशातील सर्व राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रात्री साडेसातनंतर हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांची राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार तसेच खातेवाटपाविषयी दिल्लीतील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. यापूर्वीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी चर्चा झाली होती. मात्र न्यायालयातील काही निकालांच्या पार्श्वभूमीवर विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आता विस्तार आणखी पुढे ढकलायचा की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करायचा, यावर चर्चा होणार असल्याचे कळते. राज्यातील पावसाळी अधिवेशन १८ जुलैला जाहीर करण्यात आले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने ते पुढे ढकलण्यात आले आहे. त्यात शिंदे फडणवीस सरकारचा ३० जूनला शपथविधी झाला होता. आता, त्यानंतर २२ दिवस उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठीच दिल्लीतील या भेटीदरम्यान चर्चा होणार असल्याचे समजते.