Wimbledon 2022 Final : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकलं विम्बल्डन, पटकावले २१वे ग्रँडस्लॅम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 11, 2022

Wimbledon 2022 Final : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकलं विम्बल्डन, पटकावले २१वे ग्रँडस्लॅम

https://ift.tt/CAMeg3q
लंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मक्तेदारी पुन्हा दिमाखात सिद्ध केली. निक किर्गिओसने पहिला सेट जिंकून जोकोविचसमोर आव्हान निर्माण केले खरे; पण जोकोविच त्यामुळे डगमगला नाही. त्याने शांतपणे खेळ करून विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर विजेतेपद सातव्यांदा उंचावले. आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या क्रमवारीत जोकोविच २१ विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. किर्गिओसच्या प्रभावी सर्व्हिसमुळे जोकोविचला पहिला सेट गमवावा लागला. मात्र, जोकोविचने सेंटर कोर्टवर शांतपणे खेळ करीत अंतिम लढत ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) अशी जिंकली. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या स्पर्धेत आता जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे. २२ विजेतेपदांसह नदाल अव्वल आहे, तर जोकोविच २१ विजेतेपदांसह दुसरा. फेडरर २० विजेतेपदांसह तिसरा आहे. विम्बल्डनच्या कोर्टवर आपण मागे पडलो असलो तरी जिंकणार हा विश्वास जोकोविचला असतो. तेच त्याच्या खेळातूनही दिसत असते. त्याने उपांत्यपूर्व फेरीची लढत दोन सेट गमावल्यावर जिंकली होती, तर उपांत्य आणि अंतिम फेरीची लढत पहिला सेट गमावल्यावर. त्याने २०१९ च्या अंतिम सामन्यात फेडररकडे दोन चॅम्पियनशिप गुण असताना यशस्वी प्रतिकार केला होता. यावेळीही तो डगमगला नाही. किर्गिओसला स्वतंःवर नियंत्रण राखणे अवघड जाते. तो प्रतिस्पर्ध्यास चिडण्यास भाग पाडतो. जोकोविच किर्गिओसची बडबड सुरू असतानाही शांत होता. किर्गिऑस पंचांबरोबर वाद घालत होता. चिडत होता, पण जोकोविच शांत होता. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने ०-४० पिछाडीनंतर गेम जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये सर्व्हिसवर किर्गिओस ४०-० आघाडीवर असताना जोकोविचने तोही गेम जिंकला. याच दोन गेमनी जोकोविचचे खेळावरील नियंत्रण लक्षात येते. किर्गिओसने सामन्यातील सर्वात वेगवान १३६ मेल वेगाची सर्व्हिस केली. त्याच्या ३० बिनतोड सर्व्हिस होत्या, पण जोकोविचचा हिरवळीचा राजा होता. निर्णायक लढतीत अंडरआर्म सर्व्हिसनिक किर्गिओसने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत अंडरआर्म सर्व्हिस करून वाद निर्माण केला. त्याने पहिल्या सेटमध्ये ४०-० असे आघाडीवर असताना दोन पायातून चेंडू मारून सर्व्हिस केली. ते पाहून चाहत्यांनी त्याची हुर्यो उडवली. जोकोविचने या सर्व्हिसवरील गुण जिंकला. मात्र, किर्गिओसने हा गेम जिंकण्यात यश मिळवले. किर्गिओसने कायम या प्रकारच्या सर्व्हिसचे समर्थन केले आहे. बेसलाइनपासून दूर उभे राहणाऱ्या खेळाडूंना नेटजवळ चेंडूचा टप्पा पाडण्याचा सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूचा प्रयत्न असतो. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खेळाची लय खंडित करण्यासही या सर्व्हिसचाही उपयोग होतो, असे मानले जाते