
नवी दिल्ली : एअर इंडिया कंपनी टाटा ग्रुपला विकल्यानंतर केंद्र सरकार पुढचं पाऊल टाकण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार एअर इंडियाच्या उपकंपन्या विकण्याची तयारी करत आहे. सरकारनं यासाठी बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आई स्क्वायर्ड कॅपिटल या कंपन्यांशी सरकारनं चर्चा सुरु केली आहे. एअर इंडियाच्या उपकंपन्या एअर इंडिया एअर टान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड, अलायन्स एअर आणि एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्या आहेत. एका अधिकाऱ्यानं बिझनेस टुडे या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार सरकारनं या कंपन्यांच्या संभाव्य खरेदीदारांशी चर्चा सुरु केली आहे. सरकारनं यापूर्वीच एअर इंडिया कंपनीच्या उपकंपनीच्या विक्रीसाठी परवानगी घेऊन ठेवलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन, स्क्वेअर्ड कॅपिटल यांच्याशी एअर इंडियाच्या उपकंपन्याच्या विक्रीसंदर्भात बोलणी झाली आहे. एका अधिकाऱ्यानं ते बर्ड ग्रुपच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. सरकारनं एअर इंडिया कंपनीची विक्री टाटा ग्रुपला केली. एअर इंडियावर त्यावेळी ५२ हजार कोटींचं कर्ज आहे. टाटा सन्सनं लिलावात ही कंपनी विकत घेतली होती. एअर इंडियानं त्यासाठी १८ हजार कोटींची बोली लावली होती. त्यासाठी टाटा ग्रुपनं २७०० कोटी रुपये रोख दिले होते. तर, १५ हजार ३०० कोटी रुपयांचं कर्ज होतं. एअर इंडियावरील उर्वरित कर्ज केंद्र सरकार भरणार होतं. केंद्र सरकारची आर्थिक तिजोरी मजबूत करण्यासाठी गेल्या वर्षी केंद्र सरकारानं ६ लाख कोटी रुपयांच्या नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइनची घोषणा केली होती.