
नागपूर : मोहालीच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताने त्याची परतफेड नागपूरच्या मैदानावर केली. शुक्रवारी भारताने ऑस्ट्रेलियाला जामठा मैदानावर ६ विकेट्सने धूळ चारुन मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या २० चेंडूत ४६ धावांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. पुढे शेवटच्या षटकात अनुभवी दिनेश कार्तिकने २ चेंडूत १० धावा करुन भारताची नाव विजयाच्या पैलतीरी नेली. दरम्यान पावसामुळे हा सामना ८-८ षटकांचा झाला. ऑस्ट्रेलियाने डावाची सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच षटकात विराट कोहलीकडून धडाकेबाज फलंदाज कॅमरुनचा कॅच सुटला. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर विराटने आपल्या अचूक फेकीने कॅमरुनला धावबाद केलं. कोहलीच्या या 'विराट' थ्रो ची चर्चा होतीये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये संततधार पावसामुळे आउटफिल्ड ओले झाले होते. सामना नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा सुरू झाला. आठ-आठ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावून, खराब सुरुवात करूनही पुढे वेगवान धावा केल्या आणि भारतासमोर ९१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४ चेंडू आधीच निर्धारित लक्ष्य गाठले. रोहित आणि राहुलमध्ये झटपट ३९ धावांची भागीदारी झाली. अॅडम झम्पाच्या सुंदर चेंडूवर राहुलला आपल्या यष्ट्या वाचवता आल्या नाहीत. यानंतर विराट आणि सूर्यकुमार देखील झटपट बाद झाले. भारतीय संघ काहीसा संकटात सापडला आहे, असं वाटत असतानाच रोहित शर्माने डावाची सूत्रे हातात घेत अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहत भारताला सुंदर विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या दुसऱ्या षटकात भारताकडून अक्षर पटेल गोलंदाजी करायला आला तेव्हा कॅमरुन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्न असताना सीमारेषेवर विराट कोहलीने त्याचा झेल सोडला. पण याची कसर विराटने पुढच्या २ मिनिटांत भरुन काढली. पुढच्याच चेंडूवर त्याने कॅमरुनला डगआऊटमध्ये जाण्यास भाग पाडलं. विराटच्या सुंदर फेकीवर कॅमरुन धावबाद झाला. विराटच्या या जलद फेकीची आणि चित्त्त्याच्या चपळाईची जोरदार चर्चा होतीये. विराट कोहलीच्या शानदार फेकीने ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला अवघ्या ५ धावांवर माघारी जावं लागलं. मिड-ऑनवर उभा होता, चेंडू त्याच्या हातात गेला आणि त्याने रॉकेटच्या वेगाने चेंडू बोलर एंडकडे फेकला. अक्षर पटेलने पुढचं काम तमाम केलं.