
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशात २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी देशभरातील विरोधक मोर्चेबांधणी करीत असून, त्यांच्या या आघाडीमध्ये उद्धव गटाच्या शिवसेनेचा समावेश असावा यासाठी ते फारच उत्सुक आहेत. भाजपविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा केवळ आघाडीत प्रवेशच नको, तर त्यांनी नेतृत्वही करावे, अशी आघाडीतील प्रमुख नेत्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केल्याचे समजते. देशात आधी २०१४ आणि नंतर २०१९मध्ये मोठ्या बहुमताने भाजप सत्तेवर आले. त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये पक्षाच्या विजयाची घोडदौड सुरूच आहे. अशावेळी त्यांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी देशाच्या पातळीवर विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आदी नेत्यांची फौज भाजपविरोधात आवाज देऊ लागली आहे. अशावेळी महाराष्ट्रात गेली २५ वर्षे सोबत असलेली उद्धव गटाची शिवसेना भाजपविरोधात लढायला उभी राहिल्याने विरोधकांनी या पक्षाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात भाजपने उद्धव गटाच्या शिवेसेनेला भगदाड पाडत सत्तेवरून खाली खेचले आहे. सेनेमधील फुटीमध्ये पडद्याआडून सहभाग घेणाऱ्या भाजपने एवढ्या जुन्या मैत्रीचा विश्वासघात केल्याची भावना राज्यातील शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या कार्यशैलीचा 'बळी' म्हणून उद्धव यांना पुढे करण्याची योजना विरोधकांकडून आखण्यात येत असल्याचे समजते. उद्धव यांना सहानुभूती मिळण्याची अटकळ भाजप आणि शिवसेना हे दोन्ही हिंदुत्वावादी पक्ष आहेत. त्यातच उद्धव हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचे प्रखर विचाराचे नेते म्हणून ते ओळखले जातात. २०२४ची निवडणूक जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याची ठरली तर उद्धव हे त्यासाठी चांगलाच पर्याय ठरू शकतात, असे विरोधकांना वाटते. दिल्लीकरांशी दोन हात करत असताना उद्धव यांना महाराष्ट्रातील नागरिकांची अभूतपूर्व सहानुभूती मिळेल, अशी अटकळही विरोधकांकडून बांधली जात आहे.