
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे २५ टक्के एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. दिवाळी तोंडावर आली आहे. अनेक घरांत फराळाची तयारी सुरू झाली आहे. इतर खरेदीही केली जात आहे. परंतु अनेक एसटी कर्मचारी अद्याप सप्टेंबर महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. एसटी महामंडळातील प्रशासकीय विभागातील २५ टक्के अधिकारी, कर्मचारी यांना पगार मिळालेला नाही. उर्वरित अधिकारी-कर्मचारी यांच्या बँक खात्यांत शुक्रवारी-शनिवारी पगार जमा करण्यात आला. पगार केव्हापर्यंत खात्यात जमा होईल, याबाबतही माहिती उपलब्ध होत नाही. राज्य सरकारकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेण्यात येईल, असे महामंडळाने उच्च न्यायालयात सांगितले होते. आता राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर पगार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय, तसेच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनसची घोषणा झाली आहे. सरकारकडून एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी अनुक्रमे पाच हजार आणि अडीच हजार रुपये अशी भेट देण्यात येते. मात्र पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने दिवाळी भेट मिळणार की नाही, याबाबतदेखील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये साशंकता आहे. एसटी महामंडळाकडून वाहनांचे सुटे भाग पुरवणाऱ्या पुरवठादारांची देणी थकीत आहेत. तसेच इंधन पुरवणाऱ्या कंपन्यांची थकबाकी कायम आहे. यामुळे महामंडळाची आर्थिक चणचण केव्हा दूर होणार, असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.