अमरावती : दिवाळी सणानिमित्त भाविक लक्ष्मी देवीची पूजा करतात. वैभव आणि संपत्तीचे प्रतीक म्हणून महालक्ष्मी देवीची ओळख आहे. अमरावतीच्या अशाच एका मंदिरात मागील ३८ वर्षांपासून भक्तांना चक्क देण्यात येतो. त्यामुळे येथे दर्शनासाठी दिवाळीच्या दिवसांमध्ये भक्तांची मोठी रीघ लागलेली असते. अमरावती येथील काली माता मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. कारण या मंदिरात भक्तांना प्रसाद स्वरूपात चक्क पैशाचे वितरण करण्यात येते. या मंदिराचे पुजारी येणाऱ्या भक्तांना लाह्यांसोबत पैसेही वाटतात. सदर मंदिराचे पुजारी शक्ती महाराज सांगतात की, १९८४ पासून अमरावती स्मशानभूमी परिसरातील काली माता मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या ठिकाणी लाह्यांसोबत दिवाळीच्या निमित्ताने पैशाच्या प्रसादाचे वितरण करण्यात येते. याचं कारण सांगताना शक्ती महाराज म्हणतात की, येथील पैसे आपल्या दुकान, घर व तिजोरीमध्ये ठेवल्यास बरकत मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन आटोपून भाविक प्रामुख्याने या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. दरम्यान, मागील ३८ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने पैशाच्या प्रसादासाठी रांगा लावत असल्याचे दिसून येतात.
https://ift.tt/PupxR7E