आजपासून मुंबईकरांचा आरामदायी प्रवास; पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 1, 2022

आजपासून मुंबईकरांचा आरामदायी प्रवास; पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

https://ift.tt/8pSWiMP
म. टा. प्रतिनिधी मुंबई: पश्चिम रेल्वेवरील तब्बल ३० लाखांहून अधिक प्रवाशांना सणासुदीच्या दिवसात दिलासा देणारी घोषणा पश्चिम रेल्वेने गुरुवारी केली आहे. प्रवास वेळेत बचत व्हावी, यासाठी १५ आणि १२ डब्यांच्या एकूण ५० लोकल फेऱ्यांचा विस्तार आणि प्रवास थकवा घालवण्यासाठी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेवर वाढणार आहेत. पश्चिम रेल्वेवर आज, १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतर प्रवाशांना वाढीव फेऱ्या उपलब्ध होतील. १५ अप आणि १६ डाऊन अशा एकूण ३१ एसी फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान ३७ एसी फेऱ्या आणि चर्चगेट ते बोरिवली दरम्यान १८ एसी फेऱ्या धावणार आहेत. यामुळे १ ऑक्टोबरपासून एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४८ वरून ७९वर पोहोचणार आहे. यापैकी शनिवार-रविवारी २६ एसी फेऱ्या साध्या स्वरूपात धावणार आहेत. एसी लोकल आणि १५ डबा लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. प्रवासी मागणीनुसार १५ डब्यांच्या २७ गाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ७९ फेऱ्या असून नवे वेळापत्रक लागू झाल्यानंतर या फेऱ्यांची संख्या १०६वर पोहोचणार आहे. या फेऱ्या शनिवारी असतील. यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले. नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १३७५वरून १३८३ होणार आहे. यात वातानुकूलित लोकलसह सामान्य लोकल फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. अंधेरी ते विरार दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली होती. वेग वाढणार... पश्चिम रेल्वेवर अनेक ठिकाणी वेगमर्यादा हटवण्यात आलेली आहे. यामुळे गाड्यांचा वेग वाढल्याने वाढीव लोकल फेऱ्या चालवणे शक्य झाले, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. विरारदिशेला... चर्चगेट ते विरार दरम्यान ५ फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत. जलद मार्ग, अंधेरी-वसई रोड, विरार-डहाणू रोड या मार्गावर प्रत्येकी एक आणि चर्चगेट ते बोरिवली मार्गावर दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. चर्चगेट दिशेला... डहाणू रोड ते चर्चगेट, विरार-बोरिवली, वसई रोड-अंधेरी, गोरेगाव-चर्चगेट या मार्गावर प्रत्येकी एक फेरी वाढवण्यात आली आहे. बोरिवली-चर्चगेट दरम्यान दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.