
कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पंचगंगा घाटावर पंचगंगेची महा आरती केली. कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे त्यांनी अनावरण केले. मात्र या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील मुख्यमंत्र्यांसोबत दिसल्याने लवकरच राष्ट्रवादीला हादरा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठ येथे येत्या 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 'सुमंगलम' महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी हजेरी लावली होती. सोबतच गेल्या काही दिवसांपासून ठाकरेची जवळीक लांब केलेले आणि वेट अँड वॉच च्या भूमिकेत असलेले करवीरचे माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके सुद्धा शिंदे सोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज होते. तर, गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेत ही नाराजी दर्शवत लवकरच वेगळी भूमिका घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले असताना त्यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर ए. वाय. पाटील दिसून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ला लवकरच धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष नाराज, सोडचिठ्ठी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सध्या ए. वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी मिळाल्यापासून ते प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र पक्षाने सातत्याने अन्याय केल्याची भावना त्यांची आहे.गेली अनेक वर्षे पक्षासोबत प्रामाणिकपणे काम करुनही योग्य तो सन्मान दिला नाही, याची खंत त्यांच्या मनात आहे.तसेच पक्षनेतृत्वाने अनेक वेळा आश्वासने देऊनही शब्द पाळला नाही असा सूर ही त्यांच्या कार्यकर्त्यांन मधून उठत असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शी काडीमोड घेत शिंदे च्या ढाल-तलवार शी सोयरिक करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ए. वाय. पाटील यांची भेट घडवून आणल्याचे बोलले जात होते. मात्र, आज पहिल्यांदाच ए. वाय. पाटील शिंदे सोबत दिसल्याने ए वाय पाटील आता शिंदे गटा सोबत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.