
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे आप्तस्वकीयांसह स्वागत करण्यासाठी महामुंबईतील नागरिक शहरातील पर्यटनस्थळांना भेट देतात. शहरात थंडी सुरू झाल्याने गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. नववर्ष जल्लोष केल्यानंतर रात्रीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रात्री ते पहाटेपर्यंत आठ लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या लोकलचे वेळापत्रक पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवरदेखील रात्री उशिराने लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले असून लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ मध्यरात्री धावणाऱ्या विशेष लोकल फेऱ्या चर्चगेट ते विरार : रात्री १.१५ चर्चगेट ते विरार : रात्री २.०० चर्चगेट ते विरार : रात्री २.३० चर्चगेट ते विरार : रात्री ३.२५ ...................................... विरार ते चर्चगेट : रात्री १२.१५ विरार ते चर्चगेट : रात्री १२.४५ विरार ते चर्चगेट : रात्री ०१.४० विरार ते चर्चगेट : रात्री ०३.०५