
जालना : ख्रिस्ती समाजाची बदनामी केल्या बद्दल भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ख्रिस्ती बांधवांनी आंदोलन केलं. आमदार राम सातपुते यांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभा हिवाळी अधिवेशन काळात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी ख्रिस्ती समाजावर पैसे देऊन धर्मांतर केल्याचा आरोप केला होता. हा खोटा आरोप करुन या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या साठी जालन्यात निषेध आंदोलन करण्यात आले. संतप्त ख्रिस्ती बांधवांनी आमदार राम सातपुते यांच्या फोटोला जोडे मारून त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत संताप व्यक्त केल्याचं ख्रिस्ती समाज समन्वय समिती, जालनाचे अध्यक्ष रविकांत दानम यांनी सांगितलं. ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस सुरू असून याच काळात असे विधान करून समाजा समाजात द्वेष पसरवून तेढ निर्माण करून महाराष्ट्र अस्थीर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ख्रिस्ती समाजात खोटे आमिष किंवा पैसे देऊन धर्मातर होत नाही तसे असते तर सर्वात प्रथम आम्हीच समाजबांधवांनी त्याचा विरोध केला असता, असं यावेळी आंदोलकांनी सांगितलं. महाराष्ट्रात ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना गृहामध्ये धर्मगुरू आणि चर्च मधील लोकांवर समाजकांटकांचे हल्ले वाढले असून त्याबद्दल धर्मांतराच्या खोट्या आरोपाच्या आक्षेपाने झुंडशाही व दडपशाही वाढली आहे. ती त्वरित थांबवावी तसेच त्यासाठी कडक कायदे निर्माण करावे, याच मागणीसाठी नागपूर येथे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर हिवाळी अधिवेशन काळात दररोज सकाळी ९ वाजे पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत साखळी उपोषण करण्यात आले होते, अशी माहितीही यावेळी देण्यात आलं. आमदार राम सातपुते यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे इतरांची देखील ख्रिस्ती समाजावर बदनामी किंवा अन्याय अत्याचार करण्याची हिंमत होणार नाही, अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे.आमच्या मागण्याची दखल न घेतल्यास आगामी काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ख्रिस्ती बांधवांनी दिला आहे. राम सातपुते काय म्हणाले होते? आमदार राम सातपुते यांनी नगरच्या ब्राह्मणी गावात कमल सिंग नामक ख्रिश्चन मिशनरी पोलीस निरीक्षक दराडेच्या मदतीने धर्मांतर करण्यास परावृत्त करत आहे. या समाजकंटकांनी आपल्या हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना केलीच, सोबतच महिला भगिनींचा विनयभंग केला! आज या प्रकरणाचा विधानसभेत पर्दाफाश केला व या मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या पोलीस निरीक्षक दराडे ला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली असल्याचं ट्विट राम सातपुते यांनी केलं होतं.