
रीवा : प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र, अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रुप घेतं. कपलमधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याचा किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात.आता आणखी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात प्रेयसी आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करताना दिसते. मात्र, नाराज होऊन प्रियकर अतिशय निर्दयीपणे प्रेयसीला कानशिलात लगावतो. इतक्यावर तो थांबत नाही तर पुढे तिला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करतो. तो तिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर लाथांनी मारतो. यात ही तरुणी तिथेच बेशुद्ध होते. ही संपूर्ण घटना शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. या दरम्यान गावातील काही लोक घटनास्थळी पोहोचले. ज्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणाबाबत मऊगंज एसडीओपी नवीन दुबे यांनी सांगितलं की, ही घटना गेल्या बुधवारी घडली. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे. मारहाण करणारा तरुण ढेरा गावचा रहिवासी आहे. पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीच्या आईने कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरूणावर कारवाई केली आहे. या क्रूर घटेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भीषण क्रुरता असल्यामुळे व्हिडिओ बातमीत दाखवला गेला नाही.