कार्बोप्लॅटिनची संजीवनी; स्तनांच्या कॅन्सरवर टाटा कॅन्सर रुग्णालयाचे महत्त्वाचे संशोधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 11, 2022

कार्बोप्लॅटिनची संजीवनी; स्तनांच्या कॅन्सरवर टाटा कॅन्सर रुग्णालयाचे महत्त्वाचे संशोधन

https://ift.tt/79NiuDz
मुंबई : केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. 'ट्रिपल निगेटिव्ह' या गंभीर स्वरूपाच्या कॅन्सरमध्ये 'कार्बोप्लॅटिन' या अतिरिक्त औषधांचा वापर केल्याने चारपैकी एका महिला रुग्णाचा जीव वाचवता येणे शक्य असल्याचे अतिशय महत्त्वाचे संशोधन टाटा कॅन्सर रुग्णालयाने केले आहे. १० वर्ष सुरू असलेल्या या संशोधनामध्ये वापरण्यात आलेले हे औषध एक हजार रुपये किंमतीचे असून ते शासकीय वैद्यकीय योजनांद्वारे विनाशुल्क उपलब्ध होणार आहे. टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्बोप्लॅटिन औषधावर संशोधन केले गेले. 'प्लॅटिनम इन टीएनबीसी’ हे संशोधन सॅन अँटोनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियममध्ये टाटा रुग्णालयातील वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे प्राध्यापक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सादर केले. या प्रकारच्या कॅन्सरमध्ये महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मात्र या औषधाच्या वापरामुळे २५ टक्के महिला रुग्णांचा मृत्यू ओढवला नाही. ५० वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये या औषधांचा उपयोग अतिशय परिणामकारक झाला. याशिवाय ६१ टक्के रुग्णांमध्ये कॅन्सरची गाठ पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून आले. या महिलांना स्तन काढून टाकण्याची गरज पडली नाही. या औषधाचे कोणत्याही स्वरूपाचे दुष्परिणाम नसल्याने या महिला रुग्णांना दिलासा मिळाल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. बडवे यांनी सांगितले. कार्बोप्लॅटिन हे औषध सध्या सर्व जगामध्ये उपलब्ध असून, ते अवघ्या हजार ते दीड हजारांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कॅन्सरवरील उपचार घेणे हे रुग्णांच्या आवाक्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्येही हे औषध उपलब्ध असल्याने रुग्णांना ते मोफतही मिळेल. रजोनिवृत्तीनंतर वाढणारे वजन, प्रसूतीनंतर स्तनपान न करणे, उशिरा होणारी प्रसूती अशा विविध कारणांमुळे स्तनांचा कॅन्सर वाढत आहे. त्यामुळे व्यायाम, पोषक आहार तसेच प्रत्येक वर्षी वैद्यकीय चाचण्या करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. असे झाले संशोधन टाटा कॅन्सर रुग्णालयामार्फत २०१० ते २०२० दरम्यान ट्रिपल निगेटिव्ह स्तनाचा कॅन्सर असलेल्या महिलांवर हे संशोधन करण्यात आले. या महिलांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. पहिला गट हा नियमित उपचार पद्धतीचा तर दुसरा हा कार्बोप्लॅटिन औषधांचा वापर केलेला अभ्यास गट होता. नियमित उपचार पद्धतीच्या गटातील महिलांना आठ आठवड्यांसाठी 'पॅक्लिटॅक्सेल' आठवड्यातून एकदा आणि त्यानंतर दर तीन आठवड्यांनी चार वेळा 'डॉक्सोरुविसिन' आणि 'सायक्लोफॉस्फामाइड' असलेली केमोथेरपी दिली. अभ्यास गटातील महिलांना पॅक्लिटॅक्सेलसह आठवड्यातून एकदा कार्बोप्लॅटिनच्या इंजेक्शनसह समान केमोथेरपी आठ आठवड्यांसाठी दिली. शेवटच्या केमोथेरपीनंतर दोन्ही गटातील महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर विकिरण उपचार (रेडिओथेरपी) देऊन दर सहा महिन्यांनी त्यांची तपासणी केली. नियमित उपचार पद्धतीमध्ये ६४.१ टक्के तर, कार्बोप्लॅटिन औषधामुळे ७०.७ टक्के रुग्ण बऱ्या झाल्या. नियमित पद्धतीमध्ये रुग्ण न दगावण्याचे प्रमाण ६१.७ टक्के होते, तेच कार्बोप्लॅटिनमुळे ७४.४ टक्के झाले. कार्बोप्लॅटिनमुळे ६१ टक्के तर दुसऱ्या गटातील नियमित पद्धतीमध्ये फक्त ४१ टक्के महिलांमधील ट्युमर नष्ट झाल्याचे दिसून आले.