वांद्रे स्थानकाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगराशी जोडणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 15, 2022

वांद्रे स्थानकाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगराशी जोडणार

https://ift.tt/2bRD7F5
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईच्या पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगराशी जोडण्यासाठी ‘मेट्रो २ बी’ मार्ग तयार होत आहे. उपनगरीय वांद्रे स्थानकाच्या डोक्यावरून हा मार्ग जाणार असून तो या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असेल. त्यासाठीच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद गतीने पुढे नेण्याची सूचना मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी यासंबंधीच्या तातडीच्या बैठकीत केली. ‘मेट्रो २ बी’ हा मार्ग अंधेरी पश्चिमेकडील डीएननगरजवळील ईएसआयसी कॉलनी येथून सुरू होतो. प्रेमनगर, खिरानगर, सारस्वतनगर, नॅशनल कॉलेज, बीकेसीनंतर कुर्ला पूर्व, चेंबूरमार्गे मंडाला व मानखुर्दजवळ हा मार्ग संपतो. याच मार्गावर वांद्रे मेट्रो स्थानकदेखील आहे. हे मेट्रो स्थानक सध्याच्या पश्चिम उपनगरीय स्थानकाजवळच असेल. वांद्रे स्थानकानंतर ही मेट्रो मार्गिका बीकेसीतून पुढे जाते. त्यासाठी वांद्रे पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानक व एकूणच रेल्वे मार्गाच्या डोक्यावर पूल उभारणी केली जाणार आहे. त्यासंबंधीच श्रीनिवास यांनी बुधवारी बैठक घेतली. बैठकीत त्यांनी या पूल उभारणीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यावर भर दिला. हा पूल प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असल्याने तो लवकर उभारून पूर्ण झाल्यास उर्वरित मार्गिकादेखील लवकर पूर्ण करता येईल, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. वांद्रे येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी लागणारी मंजुरी त्वरित मिळवावी आणि २३ फेब्रुवारीपर्यंत मार्ग उभारणी करण्यासाठी तातडीने व जलद कामे करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रकल्पासाठी मंडाले येथे आगार उभारला जाणार आहे. या आगाराजवळच संपूर्ण मार्गासाठी स्वतंत्र अशी वीजपुरवठा यंत्रणा आहे. त्यासाठीच्या तयारीचादेखील आयुक्तांनी आढावा घेतला. तसेच आगारातील मार्ग उभारणीचे काम जलद करण्याची सूचना दिली.