
नवी दिल्लीः भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत उत्तराखंडमध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात पंतच्या कारने पेट घेतला. पंतच्या अपघातानंतर काहींनी त्याचे सामान व पैसे घेऊन पळ काढला असल्याचं वृत्त समोर येत होतं. यावर एसएसपी अशोक कुमार यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. डुलकी लागल्याने त्याच्या कारची दुभाजकाला धडक बसली. अपघात होताच, त्याने खिडकीची काच फोडली. कारने पेट घेण्यापूर्वीच तो बाहेर पडला. कारमधून बाहेर पडताना त्याला जखमा झाल्या आहेत. अपघात झाल्यानंतर पाठीला जास्त खरचटले होते. ऋषभ पंतचा अपघात होताच तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्याची मदत करण्याऐवजी त्याचे सामान व पैसे घेऊन पोबारा केल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर पसरत आहे. मात्र, हरिद्वार पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं आहे. ऋषभ पंतचं कोणतंही सामान चोरी झालेलं नाही, असं एसएसपी अजय सिंह यांनी म्हटलं आहे. वाचाः अपघातानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहोचली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यानंतर व पूर्ण माहिती घेतल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अपघातानंतर ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्याने त्याच्याकडे फक्त एक सुटकेस व काही सामान होते ते गाडीतच जळून खाक झाले. हरिद्वार पोलिसांना घटनास्थळी सापडलेली काही रोख रक्कम, ब्रेसलेट आणि चेन ऋषभ पंतच्या आईकडे सोपवले आहे, अशी माहिती हरिद्वार एसएसपी अजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. वाचाः घटनास्थळी असलेले सीसीटीव्हीदेखील आम्ही तपासले आहेत. अपघातस्थळी आम्हाला अशी कोणतीही घटना दिसून आली नाही. त्यामुळं हे वृत्त खोटं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, आम्ही सातत्याने ऋषभ पंतच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. ऋषभ पंत अपघातात जखमी अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभच्या कपाळावर दोन खोल जखमा झाल्या आहेत. उजव्या गुडघ्याचा स्नायू फाटला आहे. त्याचबरोबर त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात, घोट्याला, पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीवर ओरखड्यांच्या जखमा आहेत. त्याच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या दुखापतीतून पूर्णपणे सावरून मैदानात पूर्वीसारखा खेळ करण्यासाठी त्याला वर्षभराचा कालावधी लागणार आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.